​सावंतवाडी : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

शेअर करा

फसवणूक प्रकरणी साटेली-सातार्डा येथील युवकाविरुद्ध गुन्हा दाखल ; संशयित ताब्यात

सावंतवाडी,दि.२ जून (प्रतिनिधी)
लग्नाचे आमिष दाखवून एका २७ वर्षीय तरुणीशी गेल्या ७ ते ८ वर्षांपासून वारंवार शरीरसंबंध ठेवत, ऐनवेळी लग्न करण्यास नकार देऊन तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात काल, सोमवारी १ जून रोजी रात्री उशिरा संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
​अभिजित कांबळी (वय ३१, रा. साटेली तर्फे सातार्डा, ता. सावंतवाडी) असे पोलीस कोठडीत असलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
​याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी अभिजित कांबळी याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून विश्वासात घेतले होते. गेल्या ७ ते ८ वर्षांच्या कालावधीत त्याने तिच्याशी वारंवार प्रेमसंबंध व शरीरसंबंध ठेवले. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष लग्नाची वेळ आली, तेव्हा संशयिताने ऐनवेळी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला आणि आपली फसवणूक केल्याचे तरुणीच्या लक्षात आले.
​अखेर या फसवणूक आणि मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून पीडित तरुणीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी काल सोमवारी रात्री उशिरा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. लग्नाचे आमिष दाखवून फसवणुकीने अत्याचार केल्याबाबतच्या या गंभीर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती माधुरी मुळीक करीत आहेत.

शेअर करा