‘चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला!
सावंतवाडी,दि.२३ जुलै
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली परिसरात सध्या दाट धुक्याची चादर पसरलेली असतानाच बुधवारी रात्री एक अत्यंत थरारक घटना घडली. आंबोली-नांगरतास गडदुवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बससमोर अचानक एक भला मोठा टस्कर हत्ती रस्त्याच्या मधोमध येऊन उभा राहिला. दाट धुक्यामुळे समोरचे दृश्य स्पष्ट दिसत नसताना अचानक टस्कर समोर आल्याने बसमधील प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. मात्र, शिवशाही बसचे चालक महेश सावंत यांनी कमालीचे प्रसंगावधान आणि संयम दाखवत बस सुरक्षित अंतरावर उभी केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
झाडीतून थेट रस्त्यावर ‘ठिय्या’:
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ही शिवशाही बस आंबोली मार्गे पुण्याच्या दिशेने जात होती. आंबोली जवळील नांगरतास आणि गडदुवाडी या परिसरात बस आली असता, रस्त्याच्या कडेला असलेल्या दाट झाडीतून एक प्रचंड मोठा टस्कर हत्ती अचानक रस्त्यावर आला. धुक्याचे साम्राज्य आणि त्यातच हत्ती अगदी बसच्या जवळ असल्याने प्रवाशांमध्ये एकच घाबरगुंडी उडाली. टस्करने काही काळ रस्त्याच्या मध्यभागीच ठिय्या मांडला होता.
चालकाचा संयम ठरला मोलाचा:
अशा बिकट परिस्थितीत अजिबात न घाबरता बसचालक महेश सावंत यांनी प्रसंगावधान राखले. त्यांनी बस अचानक ब्रेक मारून किंवा हॉर्न वाजवून हत्तीला चिथावण्याचा प्रयत्न केला नाही. उलट अत्यंत शांतपणे आणि संयमाने बस जागीच उभी ठेवली. काही वेळ रस्त्यात शांतपणे उभा असलेला हा टस्कर हत्ती अखेर स्वतःहूनच पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून गेला. हत्ती निघून गेल्यानंतर बसमधील सर्व प्रवासी आणि चालकाने सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर शिवशाही बस सुरक्षितपणे पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली.
आंबोली परिसरात भीतीचे वातावरण:
आंबोली, नांगरतास व गडदुवाडी या भागात गेल्या काही दिवसांपासून जंगली हत्तींचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी धुक्याचे प्रमाण जास्त असताना असे वन्यजीव अचानक रस्त्यावर येत असल्याने वाहनधारकांनी या मार्गावरून प्रवास करताना अत्यंत काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. चालक महेश सावंत यांच्या प्रसंगावधानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
आंबोली गाव हा आंतरराज्य महामार्गावर येते. गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा मार्ग जवळचा वाटतो. तसेच आंबोली, चौकुळ व गेळे येथील पावसाळी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यामुळे वाहनांची वर्दळ असते. जंगली हत्ती शिवाय गवा रेडे, रान डुक्कर, अस्वल, हरण अशा विविध वन्य व सरपटणारे प्राणी अशा विविध प्राण्यांचे दर्शन होत असते.