विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेती अनुभवातून मिळाले श्रम, निसर्ग व शेतकरी जीवनाचे ज्ञान
आचरा,दि.१० जुलै (अर्जुन बापर्डेकर)
शेती बाबत आवड निर्माण व्हावी, शेती मागील तंत्र,कष्ट यांचे ज्ञान व्हावे,शेतकऱ्यांबाबत आपुलकी व आदर निर्माण व्हावा याउद्देशाने
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा यांच्या वतीने “बांधावरची शिवार शाळा” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता अकरावी कला व बारावी कला शाखेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमातून
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक स्वरूपातून शेतीचे ज्ञान मिळाले, तसेच श्रम, स्वकष्ट आणि मातीशी असलेले नाते यांची जाणीव विद्यार्थ्यांना या भेटीतून करुण देण्यात आली.
या उपक्रमासाठी कालावल येथील शेतकरी माननीय उत्तम जगन्नाथ खांबल यांनी भात शेती लागवडीसाठी आपली शेती उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भात रोपांची लागवड करत प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेतला. चिखलमातीतील काम करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून येत होता.
यावेळी रानकवी ना. धों. महानोर व कवी विठ्ठल वाघ यांच्या “काळ्या मातीत तिफन चालते” या कवितांचे वाचन कु. स्वरा आचरेकर व डॉ. दत्तात्रय जाधव यांनी केले. डॉ. जाधव यांनी शेतीचे महत्त्व, शेती हे उपजीविकेचे प्रमुख साधन आणि शेतकऱ्यांचे समाजातील स्थान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांनी शेताच्या बांधावर अल्पोपहाराचा आनंद घेतला. “बांधावरची शिवार शाळा” या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवा अनुभव मिळाला आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले.
या उपक्रमासाठी श्री. पारिपत्ये एम. व्ही., सौ. भावना मुणगेकर, डॉ. दत्तात्रय जाधव व इतर शिक्षक सहभागी झाले होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अंकुश घुटुकडे संस्थाचालक व स्थानिक कमिटी सदस्य यांचे उपक्रमास मार्गदर्शन लाभले