वेंगुर्ला : पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा – नगराध्यक्ष गिरप

शेअर करा


वेंगुर्ला, दि. १९ जून (प्रथमेश गुरव)

मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणला आहे. पीएम स्वनिधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी तिन्ही टप्प्यांतील कर्जाचा लाभ घेऊन आपले व्यवसाय अधिक सक्षम करावेत आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे. बँकस्तरावर कोणत्याही प्रकारच्या अडचणी अथवा समस्या निर्माण झाल्यास त्यांनी नगरपरिषदेशी संपर्क साधावा असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने केंद्र शासनाच्या महत्त्वाकांशी पीएम स्वनिधी योजनेंतर्गत लोककल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला एकूण ३० लाभार्थी उपस्थित होते. यावेळी पीएम स्वनिधी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना क्यूआर कोडचे वाटप करण्यात आले. तसेच नव्याने कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या लाभाथ्र्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले.
मेळाव्याप्रसंगी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक गौरी मराठे, रिया केरकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, अग्रणी बँक व्यवस्थापक ऋषिकेश गावडे, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी रोहित सर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरे, समुदाय संघटक अतुल अडसूळ आदी उपस्थित होते.
ऋषिकेश गावडे यांनी बँकांच्या विविध योजना, कर्ज प्रक्रिया तसेच लाभार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच बँकस्तरावर असलेली प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील असे आश्वासनही दिली.

शेअर करा