बांदा : शाल-श्रीफळाऐवजी विद्यार्थ्यांना केळी-दूध; बांदा मराठा समाजाचा अनोखा सत्काराचा उपक्रम

शेअर करा


बांदा,दि. २० ऑगस्ट


बांदा प्राथमिक शाळा पीएम श्री क्रमांक १ येथे पत्रकार निलेश मोरजकर यांना पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना केळी व दूध वाटप करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्याऐवजी सामाजिक उपक्रमातून सत्कार करण्याच्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
मराठा समाज अध्यक्ष विराज परब म्हणाले, सत्कारमूर्तीला शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यापेक्षा एखाद्या सामाजिक उपक्रमात छोटेसे योगदान देऊन त्या सत्काराला अधिक महत्त्व प्राप्त करून देता येते. याच विचारातून हा उपक्रम राबविण्यात आला. यापुढेही शाल-श्रीफळ देण्यापुरता सत्कार मर्यादित न ठेवता, सत्कारमूर्तीच्या सन्मानाचे औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील.
पत्रकार निलेश मिरजकर म्हणाले, आजचा माझा सत्कार हा नेहमीच्या पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि मनाला स्पर्श करणारा आहे. विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवत त्यांना खाऊ वाटप करून माझा सत्कार करण्यात आला, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. अध्यक्ष विराज परब यांची ही संकल्पना खरोखरच कौतुकास पात्र आणि अनुकरणीय आहे. सत्काराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांचा विचार निश्चितच समाजाला सकारात्मक दिशा देणारा आहे.
सत्काराच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना केळी व दूध देत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे केवळ व्यक्तीचा गौरव न करता त्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची नवी पद्धत या कार्यक्रमातून पुढे आली.
यावेळी बांदा उपसरपंच रत्नाकर आगलावे, मराठा समाज माजी अध्यक्ष बाळू सावंत, राकेश परब, शिल्पा परब, अंगणवाडी सेविका वर्षा आगलावे, शिक्षक, विद्यार्थी तसेच विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

शेअर करा