इयत्ता पाचवीचे १६, तर इयत्ता आठवीचे ३ विद्यार्थी गणित प्राविण्य परीक्षेसाठी पात्र
सावंतवाडी,दि.०३ नोव्हेंबर
विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथील विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षा २०२६-२७ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत इयत्ता पाचवीतील १६ विद्यार्थी गणित प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे, यापैकी पाच विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली आहे. तसेच इयत्ता आठवीतील तीन विद्यार्थी गणित प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण व्हावी, त्यांची गणितीय क्षमता विकसित व्हावी आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी त्यांची तयारी व्हावी, या दृष्टीने विद्यालयात सातत्याने प्रयत्न केले जातात. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना श्री. गौरवी गुरुनाथ पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल विद्या विकास मंडळ इन्सुली .संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी व सदस्य, शिक्षक-पालक संघाचे पदाधिकारी व सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, आगामी गणित प्राविण्य परीक्षेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित असून, यामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीला नवी प्रेरणा मिळाली आहे.