Sawantwadi News : ४० महिलांना शिलाई मशीनचे वाटप; स्वावलंबनाच्या दिशेने कोकण एनजीओ इंडियाचे पाऊल!

शेअर करा

‘आर्केमा सिलाई स्कूल’ उपक्रमातून महिलांना कौशल्यासोबत रोजगाराची संधी; लघुउद्योजिका बनविण्याचा संकल्प!

सावंतवाडी,दि.०३ नोव्हेंबर

महिलांच्या हाताला कौशल्य, कौशल्याला रोजगार आणि रोजगारातून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याच्या उद्देशाने कोकण एनजीओ इंडियाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘आर्केमा सिलाई स्कूल’ या उपक्रमांतर्गत ४० महिलांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले. केवळ प्रशिक्षण देण्यापुरता मर्यादित न राहता महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करून देत त्यांना लघुउद्योजिका बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नवी मुंबई येथील समाज मंदिर, कोंबडभुजे हॉल येथे शिलाई प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४० महिलांना स्वयंरोजगाराचे साधन म्हणून शिलाई मशीन प्रदान करण्यात आल्या. आर्केमा केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात रायगड जिल्ह्यातील ४० गावांमधील गरजू आणि होतकरू महिलांचा समावेश करण्यात आला आहे. रिक्षाचालकांच्या पत्नी, रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांतील महिला, विधवा, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या, अविवाहित तसेच अल्पशिक्षित महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसायाचे साधन उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

या सिलाई स्कूलच्या माध्यमातून महिलांना पुढील तीन वर्षांसाठी उत्पन्ननिर्मितीच्या तीन वेगवेगळ्या संधींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्वतः शिवणकाम करून उत्पन्न मिळविणे, गावातील इतर महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देणे आणि शिलाई मशीनची दुरुस्ती करणे अशा तीन माध्यमांतून महिला आर्थिक उत्पन्न मिळवू शकतील. या माध्यमातून महिलांना दरमहा सुमारे पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविण्याची संधी निर्माण होऊ शकते, अशी माहिती कोकण संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक प्रीती पांगे यांनी दिली.

या कार्यक्रमाला आर्केमा केमिकल्स इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक श्री. विवेक कुमार जगताप, मनुष्यबळ व जनसंपर्क विभागाच्या संचालिका दीपा अरोरा, मनुष्यबळ व प्रशासन विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक विपुल सावंत, वित्त विभागाच्या सहाय्यक महाव्यवस्थापक निर्जा जोशी, उत्पादन व्यवस्थापक सचिन कोल्हे आणि आरोग्य, सुरक्षा व पर्यावरण विभागाचे महाव्यवस्थापक अमोल जाधव उपस्थित होते.

चौकोनात ठळकपणे

यावेळी बोलताना श्री. विवेक कुमार जगताप यांनी महिलांनी मेहनत घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य त्यांच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रवासात काही मदतीची आवश्यकता भासल्यास आर्केमा कंपनी आणि कोकण संस्था महिलांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कोकण एनजीओ इंडियाच्या प्रकल्प विभाग प्रमुख प्रीती पांगे, प्रकल्प प्रशासक नेत्रा कदम, पूनम जोगळे, तन्वी गावकर, राज घोलप, आदिती पाटील, क्षितिज आव्हाड आणि सुहास खामकर यांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

कोकण संस्था आतापर्यंत शेकडो महिलांसाठी स्वयंरोजगाराची साधने निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. महिलांना केवळ आर्थिक मदत देण्यापेक्षा त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वातून व्यवसाय उभा करण्याची क्षमता निर्माण करणे, हे संस्थेचे ध्येय आहे. आर्केमा सिलाई स्कूलच्या माध्यमातून महिला स्वतः कमावत्या होतील, कुटुंबाच्या आर्थिक जबाबदारीत हातभार लावतील आणि समाजात सन्मानाने व आत्मविश्वासाने जीवन जगतील, असा विश्वास प्रीती पांगे यांनी व्यक्त केला.

शेअर करा