प्रमोद कामत व ज्येष्ठ पत्रकार आशुतोष भांगले यांचा सेवाव्रती पुरस्काराने गौरव; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शैक्षणिक साहित्य वाटप आणि नवीन सदस्यांचा प्रवेश.
बांदा,दि.३१ जुलै
सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि सेवाभावी क्षेत्रात कार्यरत असलेल्या रोटरी क्लब ऑफ बांदाच्या सन २०२६-२७ या वर्षाच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. तसेच रोटरी क्लब ऑफ बांदा सेवाव्रती पुरस्काराने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि जिल्ह्यात पहिले ई-पेपर सुरू करणारे ज्येष्ठ पत्रकार आशुतोष भांगले यांचा गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच नवीन सदस्यांचा प्रवेश अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. राजाराम (आबा) धारगळकर यांनी प्रास्ताविक करून रोटरी क्लबच्या वाटचालीचा आढावा घेत उपस्थितांचे स्वागत केले. इंस्टॉलेशन अधिकारी प्रणय तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेश घाटवळ, अभिषेक माने, शशिकांत चव्हाण आणि नीता गोवेकर उपस्थित होते.
मावळते अध्यक्ष शिवानंद भिडे यांनी आपल्या कार्यकाळातील उपक्रमांचा आढावा घेताना दहावीच्या विद्यार्थ्यांना ३५० शैक्षणिक अॅम्प्सचे वितरण, आरोग्य व रक्तदान शिबिरे, बुद्धिबळ स्पर्धा, योगा मॅट वाटप, दिशा फाऊंडेशनच्या सहकार्याने “मी आणि माझे कुटुंब” या विषयावरील जनजागृती कार्यक्रम तसेच विविध शाळांना बाकांचे वाटप यांसह अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविल्याची माहिती दिली. समाजसेवेचे कार्य यापुढेही अविरत सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
यानंतर शिवानंद भिडे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष स्वप्नील धमापूरकर यांना अध्यक्षपदाची कॉलर परिधान करून पदभार सुपूर्द केला. सुदन केसरकर यांनी सचिवपदाचा, तर साईराज साळगावकर यांनी खजिनदारपदाचा कार्यभार स्वीकारला.
नवनिर्वाचित अध्यक्ष स्वप्नील धमापूरकर यांनी आगामी वर्षात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, युवक विकास, महिला सक्षमीकरण, सामाजिक जनजागृती आणि गरजूंना मदत अशा विविध क्षेत्रांत अधिकाधिक सेवाभावी उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी समीर कोलते आणि नितीन म्हावळणकर यांचे रोटरी क्लबमध्ये नवीन सदस्य म्हणून स्वागत करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले.
बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी रोटरी क्लबच्या सातत्यपूर्ण समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले. अभिषेक माने यांनी बांदा रोटरी क्लबने अल्पावधीत नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे वेगळी ओळख निर्माण केल्याचे सांगितले. राजेश घाटवळ यांनी क्लबची एकजूट हीच त्यांची ताकद असल्याचे नमूद केले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी रोटरी क्लब ऑफ बांदाने संघभावनेच्या बळावर संपूर्ण दशक्रोशीत मानाचे स्थान मिळविल्याचे सांगितले.
इंस्टॉलेशन अधिकारी प्रणय तेली यांनी मावळते अध्यक्ष शिवानंद भिडे यांच्या कार्याचे कौतुक करताना, कठीण वैयक्तिक परिस्थितीतही त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळल्याचे गौरवोद्गार काढले. रोटरी ही केवळ सेवा संस्था नसून माणसे जोडणारे कुटुंब असल्याचे त्यांनी सांगत नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य, विविध क्षेत्रांतील मान्यवर, पुरस्कारप्राप्तांचे कुटुंबीय, गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक तसेच बांदा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रूपा शिरसाठ, भक्ती आळवे व धनश्री धारगळकर यांनी केले, तर सुदन केसरकर यांनी आभार मानले.
२०२६-२७ ची नवीन कार्यकारिणी
अध्यक्ष – स्वप्नील धमापूरकर, उपाध्यक्ष – आपा चिंदारकर, सचिव – सुदन केसरकर, सहसचिव – घनश्याम पावसकर, खजिनदार – साईराज साळगावकर, सार्जंट ॲट आर्म्स – दिगंबर गायतोंडे, क्लब कार्यकारी सचिव – हनुमंत शिरोडकर, क्लब फाउंडेशन अध्यक्ष – आनंद गावस, क्लब सदस्यता अध्यक्ष – राजाराम धारगळकर, क्लब पब्लिक इमेज अध्यक्ष – डॉ. नारायण नाईक, क्लब सेवा प्रकल्प अध्यक्ष – रत्नाकर आगळवे, व्यावसायिक सेवा संचालक – सुनील रावूळ, युवा सेवा संचालक – स्वागत नाटेकर, समुदाय सेवा संचालक – दिलीप कोरगावकर, मनसुख वसानी, यशवंत आलवे व दादा पावसकर, आंतरराष्ट्रीय सेवा संचालक – संतोष सावंत, बुलेटिन संपादक – विराज परब, साक्षरता अध्यक्ष – रवींद्र गावस, क्लब लर्निंग फॅसिलिटेटर – योगेश परुळेकर, आरोग्य प्रतिबंधक अध्यक्ष – सुधीर शिरसाट, आरोग्य उपचार अध्यक्ष – अनंत नाडकर्णी, सीएसआर अध्यक्ष – प्रमोद कामत, आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष – नरसिंह काणेकर, रोटरी इंडिया अध्यक्ष – सीताराम गावडे, जलसंधारण अध्यक्ष – दिलीप घोगळे, क्लब सदस्यता प्रमुख – फिरोज खान, क्लब प्रशिक्षक – उत्तम सातार्डेकर, तात्काळ माजी अध्यक्ष – शिवानंद भिडे, चार्टर अध्यक्ष – मंदार कल्याणकर, सदस्य – वसंत रावूळ व प्रवीण शिरसाट.
कै. सिद्धी शिवानंद भिडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट विद्यार्थ्याचा दरवर्षी सन्मान
रोटरी क्लब ऑफ बांदातर्फे कै. सिद्धी शिवानंद भिडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुढील वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका उत्कृष्ट विद्यार्थ्याचा दरवर्षी विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात येणार असून उपस्थितांनी या घोषणेचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.