बांदा,दि.२५ जुलै
आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या वतीने इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालयात मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिर उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात माजी सभापती सुस्मिता जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी माजी सभापती विनायक दळवी, सरपंच तात्या वेंगुर्लेकर, सदा राणे, रामचंद्र चराटकर, झेवियर फर्नांडिस यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील नामांकित नेत्रतज्ज्ञांच्या पथकासह इन्सुली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. भाग्यवंत, दीपा देसाई व दिपाली खडपकर यांच्या सहकार्याने सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिबिर पार पडले. या सामाजिक उपक्रमाचा चारशेहून अधिक ग्रामस्थांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन ‘नारायण उर्फ बबन राणे मित्र मंडळा’तर्फे करण्यात आले.