बांदा : मळगावात गवे-रेड्यांचा धुमाकूळ; तत्काळ बंदोबस्ताची मनसेची मागणी

शेअर करा

बांदा ,दि.०९ ऑगस्ट
मळगाव गावातील भरवस्ती तसेच शेतकऱ्यांच्या शेतात गवे-रेड्यांचा वाढता वावर सुरू असून, भातपिकांसह अन्य शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. भरवस्तीत गवे-रेडे येत असल्याने ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर गवे-रेड्यांचा तात्काळ बंदोबस्त करून शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली.
याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. गवे-रेड्यांमुळे नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करून शासन नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, तसेच वनविभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून गवे-रेड्यांना मानवी वस्तीत येण्यापासून रोखावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, सावंतवाडी शहराध्यक्ष राजू कासकर आणि मळगाव विभागाध्यक्ष राकेश परब उपस्थित होते. गवे-रेड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने वनविभागाने विलंब न करता ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शेअर करा