बांदा : गुरूंचा सन्मान हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली : प्रा. डॉ. एम. एन. वालावलकर

शेअर करा

बांदा ,दि.३१ जुलै
गोगटे–वाळके महाविद्यालय, बांदा यांच्या सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित गुरुपौर्णिमा समारंभात गुरूंच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महाविद्यालय समन्वयक प्रा. डॉ. एम. एन. वालावलकर यांनी, “आधुनिक काळाचे भान राखत जीवनात लाभलेल्या प्रत्येक गुरूचा सन्मान करा. निसर्ग ही बिनभिंतीची शाळा असून आयुष्यभर ज्ञान ग्रहण करण्याची वृत्ती माणसाला यशाच्या उंचीवर घेऊन जाते,” असे प्रतिपादन केले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर होते. प्रास्ताविक व स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. रश्मी काजरेकर यांनी केले. दीपप्रज्वलनानंतर प्रथम वर्ष कला शाखेचे विद्यार्थी अमोल देसाई व सुहानी जाधव यांनी गुरूप्रती कृतज्ञतेच्या भावना व्यक्त केल्या.

प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी अध्यक्षीय भाषणात भारतीय ज्ञानपरंपरेत गुरूचे स्थान सर्वोच्च असल्याचे सांगत, गुरूंच्या प्रेरणेमुळेच व्यक्तिमत्त्व घडते, विवेक जागृत होतो आणि जीवनाला योग्य दिशा मिळते, असे नमूद केले. गुरू-शिष्य नाते हे श्रद्धा, संस्कार आणि ज्ञानाचा पवित्र सेतू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षण प्रसारक मंडळ, बांदाचे माजी संचालक गुरुवर्य शरदचंद्र महाबळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रमाकांत गावडे यांनी, तर आभार प्रा. डॉ. अनिल शिर्के यांनी मानले. यावेळी प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांच्या हस्ते महाविद्यालयातील सर्व गुरूजनांचा सन्मान करण्यात आला.

शेअर करा