बांदा : व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम प्रशालेत कारगिल विजय दिन उत्साहात

शेअर करा

बांदा,दि.२८ जुलै
बांदा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम प्रशालेत कारगिल विजय दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक ऑननरी कॅप्टन लक्ष्मण वासुदेव राणे, तर विशेष अतिथी म्हणून माजी सैनिक हवालदार दिपक शांताराम राऊळ, बाळकृष्ण गोविंद लिंगवत आणि भरत गुरुनाथ गवस उपस्थित होते. यावेळी उपमुख्याध्यापिका शिल्पा कोरगावकर, शिक्षिका रसिका वाटवे व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रतीक्षा शिरोडकर व्यासपीठावर उपस्थित होत्या.


दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपमुख्याध्यापिका शिल्पा कोरगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर एम. एस. ए. टी. विभागाचे निदेशक भूषण सावंत यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. इयत्ता नववीची सिया देसाई व पाचवीची मायशा मकानदार यांनी कारगिल विजय दिनाचे महत्त्व सांगून शहीद जवानांना मानवंदना अर्पण केली. इयत्ता पहिलीतील उरुज फातिमा, वीरा मोरे, दर्श पार्सेकर तसेच दुसरीतील अथर्व देसाई यांनी आर्मीच्या वेशभूषेत सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.


अतिथींनी कारगिल विजय दिन हा भारतीय शौर्य, त्याग आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन भूषण सावंत यांनी, तर आभार प्रदर्शन श्रुती रेडकर यांनी केले.

शेअर करा