बांदा-सटमठवाडी जिल्हा परिषद शाळेतील घटना : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
बांदा,दि.३० जुलै
बांदा-सटमठवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण व धोकादायक छतामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. वर्ग सुरू असतानाच छतावरील कौले तुटून विद्यार्थ्यांसमोरच कोसळली. थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. याची दखल घेत शिक्षण विभागाने तातडीने छप्पर दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावे लागेल असा मागणी वजा इशारा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्या या दुर्लक्षाबाबत स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, प्रसाद वीर, राकेश विरनोडकर, प्रदीप कळंगुटकर, राजदीप पावसकर व महेंद्र मांजरेकर यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुख्याध्यापिका आश्लेषा कांबळी यांनी शाळेची गंभीर अवस्था निदर्शनास आणून देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने दुरुस्तीची मागणी केली.
मुख्याध्यापिका कांबळी या विद्यार्थ्यांना शिकवत असतानाच छतावरील कौले अचानक खाली पडल्याने काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र थोडासा उशीर झाला असता मोठा अनर्थ ओढवला असता. गेल्या पंधरा दिवसांत बांदा परिसरातील जिल्हा परिषद शाळांच्या छतासंदर्भातील ही तिसरी गंभीर घटना असल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा छप्पर दुरुस्तीचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केले. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप साईप्रसाद काणेकर यांनी केला. विद्यार्थ्यांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करत त्यांनी तातडीने निधी मंजूर करून दुरुस्ती करण्याची मागणी केली.
पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक म्हणाल्या की, वाढत्या पटसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळेची सुरक्षितता अत्यावश्यक आहे. पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी त्वरित कार्यवाही आवश्यक आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करणार, असे स्पष्ट केले.
मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दूरवस्था, खेळणी साहित्याची झालेली मोडतोड निदर्शनास आणून दिली. शाळेतील पिण्याच्या पाण्याची टाकी अस्वच्छ अवस्थेत असून त्यात अळ्या निर्माण झाल्या आहेत. खेळाचे साहित्यही खराब झाले असून शाळेच्या बाहेरील भिंती मोडकळीस आल्या आहेत. ठिकठिकाणी छप्पर मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. भविष्यात अपघात घडल्यास जिल्हा परिषद शिक्षण विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा सावंत यांनी दिला.
