बांदा : वादळी पावसाचा पाडलोसला तडाखा; चार लाखांचे नुकसान

शेअर करा

बांदा, दि. ०८ जुलै
सोमवारी सायंकाळी झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने पाडलोस गावाला जोरदार तडाखा दिला. वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळणे, घरावरील पत्रे उडणे आणि मांगरांचे नुकसान अशा घटनांमध्ये सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल प्रशासनाने व्यक्त केला आहे.


वादळी वाऱ्यामुळे विजय महादेव सातार्डेकर यांच्या मांगरावर तसेच शौचालयावर मोठे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. तर सुभाष सगुण करमळकर यांच्या घरावरील पत्रे वाऱ्याच्या जोरदार झोतामुळे उडून गेल्याने घराचे नुकसान झाले. याशिवाय रामचंद्र सुरभा गावडे आणि कृष्णा सिताराम गावडे यांच्या मांगरावर झाड कोसळल्याने त्यांनाही आर्थिक फटका बसला.


घटनेची माहिती मिळताच पाडलोस ग्राम महसूल अधिकारी सुप्रिया शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच सलोनी पेडणेकर, पोलिस पाटील रश्मी माधव, महसूल सेवक विष्णू वेंगुर्लेकर, ग्रामस्थ गोपाळ करमळकर तसेच नुकसानग्रस्त नागरिक उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी नुकसानाची पाहणी करून अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली.


वादळी पावसामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदतीची गरज निर्माण झाली आहे.


नुकसानग्रस्तांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, तसेच पावसाळ्यात अशा घटना टाळण्यासाठी धोकादायक झाडांची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शेअर करा