बांदा पोलिसांची धडक कारवाई;8.22 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

शेअर करा

गोव्यातून सावंतवाडीकडे होणारी तस्करी उधळली; मारुती सुझुकी इकोसह विमल, रजनीगंधा, V-1 तंबाखू व जर्दा जप्त

बांदा,दि.३० जुलै

गोवा येथून सावंतवाडीच्या दिशेने प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर बांदा पोलिसांनी धडक कारवाई करत ₹8 लाख 22 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी इको गाडीही ताब्यात घेण्यात आली.
गुरुवारी (दि. 30) बांदा चेकनाका येथे वाहनांची तपासणी सुरू असताना MH-07-AS-6441 क्रमांकाची मारुती सुझुकी इको गाडी संशयावरून थांबवून तपासण्यात आली. वाहनातील गोण्यांची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला, V-1 तंबाखू, रजनीगंधा पान मसाला तसेच तुलसी रॉयल जाफरानी जर्दा असा मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य माल आढळून आला.
या कारवाईत ₹3 लाख 22 हजार 300 किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच ₹5 लाख किमतीची मारुती सुझुकी इको गाडी असा एकूण ₹8 लाख 22 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास बांदा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोबेशनरी डीवायएसपी शेलार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, जीपीएसआय गवस, जीपीएसआय पवार, हवालदार मुणगेकर, महिला हवालदार प्रसादी, हवालदार भोगले तसेच पोलीस शिपाई कापसे, पाटील, हिर्लेकर व हळदे यांनी केली.

शेअर करा