चार दशकांपासून ज्येष्ठ मूर्तिकार नाना परब यांची आकर्षक गणेशमूर्तींना मोठी मागणी; नवोदित मूर्तिकार घडविण्याचाही उपक्रम.
बांदा,दि.०१ ऑगस्ट
गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र गणेशमूर्ती शाळांमध्ये लगबग सुरू झाली आहे. अशाच मूर्तिशाळांपैकी पाडलोस केणीवाडा येथील ओमकार आर्ट गणेश मूर्ती शाळा आपल्या दर्जेदार, आकर्षक आणि मागणीप्रमाणे साकारल्या जाणाऱ्या गणेशमूर्तींसाठी विशेष ओळख निर्माण करत आहे. गेली चार दशके आपल्या कलेच्या बळावर हजारो गणेशभक्तांच्या घरात बाप्पाचे आगमन घडविणारे ज्येष्ठ मूर्तिकार नाना परब यांनी मूर्तिकलेचा वारसा केवळ जपलाच नाही, तर अनेक नवोदित मूर्तिकारही घडविले आहेत.
लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असलेल्या नाना परब यांना आरोस येथील मूर्तिशाळेने प्रेरणा दिली. कोणताही गुरु न करता किंवा कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता केवळ जिद्द, मेहनत आणि निरीक्षणाच्या बळावर त्यांनी मूर्तिकलेत प्राविण्य मिळविले. १९८६-८७ पासून पाडलोस केणीवाडा येथे त्यांनी गणेशमूर्ती घडविण्याचा प्रवास सुरू केला. एका मातीच्या मूर्तीसाठी किमान चार दिवस मेहनत घ्यावी लागते. माती, रंग, वाहतूक आणि इतर साहित्याच्या वाढत्या खर्चानंतरही गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता लोकांच्या अपेक्षेप्रमाणे मूर्ती तयार करण्यावर त्यांचा भर असतो.
राजन नाईक, प्रदीप मेस्त्री, राजू मेस्त्री, चेतन कोरगावकर, यश परब आणि ओमकार नाईक यांच्या सहकार्यामुळे ओमकार आर्टची परंपरा अधिक बहरत आहे. कलेला व्यवसायापेक्षा संस्कार मानत तिचे जतन करण्याचा नाना परब आणि प्रज्वल परब यांचा दृष्टिकोन आजच्या पिढीतील प्रत्येक मूर्तिकारासाठी प्रेरणादायी आहे. परंपरा, गुणवत्ता आणि निस्सीम कलाप्रेम यांच्या जोरावर उभी राहिलेली ही मूर्तिशाळा खऱ्या अर्थाने कोकणातील मूर्तिकलेचा अभिमान ठरत आहे.
40 टक्के मागणी गोव्यातील
गोव्यातील म्हापसा, वास्को, पेडणे, मेणकुरे, उगवे, साळ, पालये आदी भागांतून त्यांच्या मूर्तींना मोठी मागणी असून, एकूण मागणीपैकी सुमारे ४० टक्के मागणी गोव्यातून येते. मोठ्या मूर्तींसाठी तर गोव्यातील गणेशभक्त विशेष पसंती देतात.
बीकॉम झालेला युवक जोपासतो कला
या कलेचा वारसा आता नाना परब यांचा मुलगा प्रज्वल परब समर्थपणे पुढे नेत आहे. बी.कॉम.चे शिक्षण पूर्ण करूनही नोकरीच्या मागे न लागता त्यांनी आजोबा आणि वडिलांकडून लाभलेली मूर्तिकलेची परंपरा स्वीकारली. भजनाची आवड आणि मूर्तिकलेची साधना यांचा सुंदर संगम त्यांनी साधला आहे. लोकांच्या मागणीनुसार, विशेषतः बालक पद्धतीच्या गणेशमूर्ती घडविण्यावर त्यांचा भर असून त्यांच्या कलाकृतींनाही मोठी पसंती मिळत आहे.