बांदा,दि.३१ जुलै
ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत सन २०२६-२७ च्या विकास आराखड्याला एकमताने मंजुरी देत ग्रामविकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. घरपट्टी व पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली, सरकारी जागांवरील अतिक्रमण हटविणे, कार्यालयीन कामकाज अधिक सक्षम करणे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम राबविण्याची गरज यावर सभेत विशेष भर देण्यात आला.
सभेत सदस्य फिरोज खान यांनी घरपट्टी व पाणीपट्टीची प्रभावी वसुली करण्याची मागणी करत, अनेक फ्लॅटधारक बाहेरगावी राहत असल्याने त्यांच्या भाडेकरूंमार्फत कर वसुलीची कार्यपद्धती स्पष्ट करण्याची आवश्यकता व्यक्त केली. थकीत करधारकांवर कठोर कारवाई करून त्यांना तातडीने नोटिसा बजावण्यात याव्यात, अन्यथा थकबाकीची समस्या अधिक गंभीर होईल, असे मत सदस्य अन्वर खान यांनी मांडले.
टोलनाका परिसरातील मोठ्या प्रमाणातील थकबाकीचा मुद्दा सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी उपस्थित केला. त्यावर सरपंच अपेक्षा नाईक यांनी उर्वरित थकबाकीदारांची यादी तयार करून नोटिसा देण्यासह आवश्यक असल्यास बोजा चढविण्याची कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येईल, असे स्पष्ट केले. याचवेळी थकीत वसुलीची माहिती वेळेत उपलब्ध होत नसल्याबद्दल सरपंचांनी कर्मचारी वर्गावर नाराजीही व्यक्त केली.
मुस्लिम दफनभूमीच्या सर्वेक्षणाचा विषयही सभेत चर्चिला गेला. सरकारी जागांवरील अतिक्रमणांचा प्रश्न गांभीर्याने घेत ग्रामपंचायतीच्या ताब्यातील सर्व जमिनींची नोंद अद्ययावत करून अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आवश्यक सहकार्य करण्याची तयारीही सदस्यांनी दर्शविली.
ग्रामीण विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांची माहिती उपलब्ध व्हावी आणि त्यांच्यात जनजागृती निर्माण व्हावी यासाठी ग्रामपंचायतीमार्फत मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याची सूचना सभेत करण्यात आली.
ग्रामसेवक तन्वी गवस, सरपंच अपेक्षा नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, सदस्य आबा धारगळकर, रेश्मा सावंत, शिल्पा परब, तन्वी व्हराडकर, प्रशांत बांदेकर, साईप्रसाद काणेकर, शाम मांजरेकर, देवल एडवे, रूपाली शिरसाठ, श्रेया केसरकर, पंचायत समिती सदस्य कृतिका नाईक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या शेवटी सन २०२६-२७ चा ग्रामपंचायतीचा विकास आराखडा एकमताने मंजूर करण्यात आला.