बांदा : गुरूप्रती कृतज्ञतेचा भाव; व्ही. एन. नाबर विद्यासंकुलात गुरुपौर्णिमा उत्साहात

शेअर करा

बांदा,दि.३१ जुलै
गुरू हा प्रत्येकाच्या जीवनाचा खरा मार्गदर्शक असून त्याच्या ज्ञानऋणातून कधीही मुक्त होता येत नाही, हा संदेश देणारा गुरुपौर्णिमेचा सोहळा बांदा येथील व्ही. एन. नाबर विद्यासंकुलात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी जगद्गुरू व्यासमुनी यांच्या प्रतिमेला तसेच संस्थेचे प्रेरणास्थान विश्राम नृसिंह (व्ही. एन.) नाबर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत गुरूंच्या ऋणाची जाणीव व्यक्त केली. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी “गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा” हे गीत सादर करून गुरुवंदना केली.
विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प आणि शुभेच्छापत्र देऊन आशीर्वाद घेतले. श्रीमती स्नेहा नाईक यांनी आई-वडील व गुरूंच्या उपकारांची जाणीव कायम ठेवण्याचे आवाहन केले, तर उपमुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा कोरगावकर यांनी गुरूंचा आदर, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यांनी सप्तर्षींची माहिती देत गुरूंचे जीवनातील स्थान अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सेजल सखाराम सावंत, तर आभारप्रदर्शन कु. ऋतुराज दिगंबर नाईक यांनी केले. विरांश विक्रम परब व विदुला विक्रम परब यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्तगुरूंची मूर्ती शाळेला भेट दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

शेअर करा