पूजा चौहान घरातून अचानक निघून गेल्यानंतर बांदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; फिर्यादी संगीता राऊळ यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
बांदा,दि.२३ जुलै
आठ महिन्यांचा मुलगा यश चौहान याच्यासह राहत असलेली त्याची आई पूजा चौहान ही महिला अचानक घरातून निघून गेल्याने तिचा शोध घेऊनही ती मिळून न आल्याने बांदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी फिर्यादी संगीता राऊळ यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी पूजा चौहान हिचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, २१ जुलै रोजी सकाळी सुमारे ९.१५ वाजता फिर्यादी संगीता राऊळ या कामानिमित्त समाजसेवा हायस्कूल, कोलझर येथे गेल्या होत्या. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सदर महिलेचा मुलगा यश चौहान याची तब्येत बिघडल्याने फिर्यादी संगीता राऊळ यांचे पती महेंद्र राऊळ यांनी पूजा चौहान हिला सदर महिलेचा मुलगा यश चौहान याच्यासह उपचारासाठी सावंतवाडी येथे नेले. उपचारानंतर दुपारी सुमारे १२.३० वाजता ते घरी परतले.
दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास पूजा चौहान ही कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. त्यानंतर महेंद्र राऊळ यांनी परिसरात तसेच विविध ठिकाणी तिचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. सायंकाळी सुमारे ५.३० वाजता फिर्यादी संगीता राऊळ घरी आल्यानंतर त्यांनी व त्यांचे पती महेंद्र राऊळ यांनी पूजा चौहान हिचा सर्वत्र शोध घेतला. तरीही तिचा ठावठिकाणा लागला नाही.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, पूजा चौहान हिचे पूर्ण नाव व कायमचा पत्ता माहिती नसून ती सदर महिलेचा मुलगा यश चौहान याच्यासह राऊळ कुटुंबाकडे राहत होती. सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्याने फिर्यादी संगीता राऊळ यांनी बांदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास बांदा पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक सीताकांत नाईक करीत आहेत.