सत्यम महिला प्रभाग संघाची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
बांदा ,दि.३१ जुलै
ग्रामीण भागातील महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून लघु व गृहउद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. कोणत्याही अडचणीच्या वेळी भाऊ म्हणून मदतीसाठी नक्की हाक द्या, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले.
सत्यम महिला प्रभाग संघ, बांदा यांच्या पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन आनंदी मंगल कार्यालय येथे उत्साहात करण्यात आले. प्रमोद कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेचे उद्घाटन झाले. यावेळी पंचायत समिती सभापती सुश्मिता जाधव, बांदा सरपंच प्रियंका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, एमएसआरएलएमच्या तालुका व्यवस्थापक स्वाती रेडकर व रिधिमा पाटकर, सिंधुदुर्ग बँकेचे शाखा व्यवस्थापक जगदीश चव्हाण, जिल्हा व्यवस्थापन टीम तसेच महिला व बालविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रभाग संघाच्या सचिव हर्षदा गवस व कोषाध्यक्ष एकता गवस यांनी वार्षिक अहवाल व जमा-खर्च पत्रक सादर केले. मागील आर्थिक वर्षात संघाने उल्लेखनीय प्रगती साधल्याचे सांगताना हे यश सभासदांच्या विश्वासाचे व सहकार्याचे फलित असल्याचे अध्यक्षा दिपाली बांदेकर यांनी नमूद केले.
सभेत मागील वर्षाचा ताळेबंद एकमुखाने मंजूर करण्यात आला. तसेच संघाचा विस्तार व महिलांसाठी नवीन योजना राबविण्याबाबत महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. महिलांनी उभारलेल्या विविध उत्पादनांच्या स्टॉलला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे नियोजन प्रभागसंघ व्यवस्थापक शिल्पा सावंत व सहकाऱ्यांनी केले. सूत्रसंचालन समीर नाईक यांनी, तर आभार लक्ष्मी सावंत यांनी मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.