कवळास’ कार्यक्रमाने उत्सवाचा समारोप; तरंगदेवता आणि श्री जैतिर देवतेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी**
वेंगुर्ला दि. २५ मे(प्रथमेश गुरव)
तुळस गावात सुरु असलेल्या प्रसिद्ध श्री जैतिर उत्सवाची सांगता आज सोमवारी “कवळास’ या परंपरागत कार्यक्रमाने झाली. तुळस पंचायतनातील तरंगदेवता आणि श्री जैतिर देवतेचे दर्शन घेण्यासाठी बहुसंख्य भाविकांनी गर्दी केली.
वैशाख अमावास्येला होणारा हा उत्सव तुळस गावातील प्रमुख उत्सव मानला जातो. या दरम्यान, शाळांना सुट्टी पडल्याने गावातील चाकरमान्यांसोबतच माहेरवाशीणीसुद्धा या उत्सवाला उपस्थित असतात. यावर्षी हा उत्सव मे महिन्याच्या मध्यांतरावरच आल्याने चाकरमानी, माहेरवाशीणी तसेच अन्य ठिकाणच्या भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत दर्शन घेतले. उत्सवाच्या पाचव्या दिवसापासून श्री जैतिर देवाने तुळस गावातील प्रत्येक भक्तांच्या घरी जात त्यांना आशीर्वाद दिला. यावेळी मोठ्या उत्साहात भाविकांनी देवाचे मनोभावे पूजन केले.
या उत्सावाची सांगता आज सोमवारी सायंकाळी कवळासाने झाली. सकाळपासूनच ठिकठिकाणच्या भाविकांनी मंदिरात उपस्थित रहात देवाला केळी, नारळ अर्पण केले. तर गावातील भाविकांनी, चाकरमान्यांनी, माहेरवाशीणींनी तसेच अन्य भक्तांनी आपला वार्षिक कुळाचार पार पाडला. त्यानंतर मंदिर परिसरात असलेल्या विविध साहित्यांची खरेदीही केली. जसजशी सायंकाळी होऊ लागली तसतशी उत्सवाच्या सांगतेची वेळ जवळ आली. अवसारी देवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली. सरतेशेवटी कवळासाने उत्सवाची सांगता झाली.
फोटोओळी – “कवळास’ या परंपरागत कार्यक्रमाने जैतिर उत्सवाची सांगता झाली. यावेळी देवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी बहुसंख्य भाविकांनी केली.