मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर मेळावा; विनायक राऊत, महादेव जानकरांसह विविध पक्षांचे नेते उपस्थित राहणार
देवगड,दि.०२ जुलै
आपल्या न्याय्य मागण्यांसाठी व देवगडातील प्रस्तावित अणुउर्जा प्रकल्पाविरोधात आंबा काजू बागायतदार व व्यापारी महासंघाने आज दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 10 वाजता मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी जाहीर मेळावा व जलसमाधी आंदोलन आयोजित केले आहे.हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणार असून उबाठा शिवसेनेचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनही सज् ज झाले आहे.
नैसर्गिक आपत्ती व आस्मानी संकटामुळे नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांना शासनाने हेक्टरी पाच लाख रूपये तर काजू बागायतदारांना हेक्टरी तीन लाख रूपये भरपाईपोटी मदत द्यावी अशी मागणी आंबा काजू बागायतदार व व्यापारी महासंघाने केली होती.शासनाने हेक्टरी 22 हजार 500 रूपयांची मदत जाहीर केल्यानंतर ही मदत अपुरी असल्याचे सांगत बागायतदारांनी मोर्चा व आंदोलने केली.आंबा बागायतदारांना हेक्टरी पाच लाख रूपये तर काजू बागायतदारांना हेक्टरी तीन लाख रूपये मदतीच्या मागणीवर महासंघ ठाम आहे.या मागणीसह देवगड तालुक्यात प्रस्तावित असलेल्या अणुउर्जा प्रकल्पाविरोधात महासंघाने 3 जुलै रोजी जलसमाधी आंदोलन पुकारले आहे.या आंदोलनात देवगडसह जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून बागायतदार सहभागी होणार आहेत.या आंदोलनाला यापुर्वी सिंधुदूर्ग मनसेने पाठींबा दर्शविला असून विविध संघटना, पर्यावरणवादी संघटना, काही राजकीय पक्षांनी पाठींबा दर्शविला आहे.मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी होणाèया या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनही सतर्क झाले आहे.आपत्कालीन यंत्रणेसह,महसुल, पोलिस यंत्रणा सतर्क राहीले आहेत.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मुख्य आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा बजाविल्या आहेत.