दोडामार्ग : साटेली भेडशी घरफोडीचा काही तासांत छडा; चोरीचे सोन्याचे दागिने जप्त

शेअर करा

दोडामार्ग पोलिसांची धडाकेबाज कारवाई; संशयित आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत, पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांची माहिती

दोडामार्ग, दि. २ जुलै
चार दिवसांपूर्वी साटेली भेडशी वरचीवाडी येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी चोरीला गेलेले सोन्याचे दागिने संशयित आरोपी कडून जप्त करण्यात आले. अवघ्या काही तासात चोरीचा छडा लावला आहे. दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दागिने जप्त केल्याची माहिती दिली.

साटेली भेडशी वरचीवाडी येथील घरफोडी प्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाणे गु.र.नं. 132/2026, भारतीय न्याय संहिता कलम 331 (3), 331(4), 305(अ), हा गुन्हा दिनांक 28/06/2026 रोजी रात्रौ 10.00 ते दिनांक 29/06/2026 रोजी सकाळी 06.00 वा. चे मुदतीत मौजे साटेली भेडशी वरचीवाडी, ता. दोडामार्ग येथे घडलेला होता. सदर गुन्हयामध्ये अज्ञात आरोपी यांनी फिर्यादी आशेशाव सालू रॉड्रीक्स यांचा भाऊ रोमाल शिलोरीयान फर्नांडीस यांचे घराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश करुन घरातील एकूण 3,07,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरुन नेलेली होती. म्हणून फिर्यादी यांनी दिले फिर्यादी वरुन दिनांक 29/06/2026 रोजी 15.29 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास आशिष भगत, पोलीस उपनिरीक्षक, दोडामार्ग पोलीस ठाणे हे करीत आहेत.

केलेली कामगीरी – सदर गुन्हयाचे अनुषंगाने गोपनिय बातमीदार तसेच सिंधुदुर्ग पोलीस दलाचा श्वान सनी

याच्या मदतीने संशयीत आरोपी म्हणून हर्ष सुर्यकांत नाईक वय 19 वर्षे, रा. साटेली भेडशी ता. दोडामार्ग यास पोलीसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले असता, हर्ष सुर्यकांत नाईक याने गुन्हा केल्याची कबुली दिल्यावर त्याचे ताब्यातून त्याने साटेली भेडशी वरचीवाडी, ता. दोडामार्ग येथे घरफोडी चोरी केलेले सुमारे 14 तोळे सोन्याचे दागीने जप्त करुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग श्री. मोहन दहीकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीम. नयोमी साटम, पोलीस निरीक्षक दोडामार्ग श्री. हेमचंद्र खोपडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. नरेंद्र पाटील, सपोनि श्री. मागाडे, पोउनि श्री. आशिष भगत, वसंत देसाई, विठोबा सावंत, विक्रम गवस, बाळकृष्ण गवस, अंकुश नाईक, विजय जाधव, परशुराम सावंत, गावडे यांनी केलेली आहे.

शेअर करा