देवगड : “२२० रुपयांच्या मदतीने शेतकऱ्यांची थट्टा; अणुऊर्जा प्रकल्प कोकणावर लादू देणार नाही”-युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक

शेअर करा

मिठीमुंबरीतील जलसमाधी आंदोलनात युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सरकारवर घणाघात; ‘गरज पडल्यास उद्धव ठाकरे यांनाही कोकणात आणू’

देवगड,दि.०३ जुलै
आंबा-काजू बागायतदारांना न्याय, नुकसानभरपाई देण्याऐवजी तुटपुंजी मदत जाहीर करून राज्य सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. आता त्याच मदतीचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी धावत आहेत. दुसरीकडे देवगडच्या माथ्यावर अणुऊर्जा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न सुरू असून कोकणच्या अस्तित्वावर घाला घालणारा हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा घणाघाती इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला.

मिठीमुंबरी येथे आयोजित जलसमाधी आंदोलनातील मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकार, पालकमंत्री आणि प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावर जोरदार टीका केली.

सुशांत नाईक म्हणाले, आंबा आणि काजू बागायतदारांसाठी गेल्या पाच महिन्यांपासून सातत्याने लढा सुरू आहे. या आंदोलनादरम्यान अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले, मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. आंबा बागायतदारांना हेक्टरी पाच लाख आणि काजू बागायतदारांना हेक्टरी तीन लाख रुपयांची मदत देण्याची मागणी असताना सरकारने अत्यल्प मदत जाहीर केली. एवढ्यावरही काही जण श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावत असल्याची टीका त्यांनी केली.

ओरस येथील मेळाव्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरू देणार नसल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, सरकारने दिलेल्या अपुऱ्या मदतीमुळेच आज शेतकऱ्यांना जलसमाधी आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे नाईक म्हणाले.

प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावर बोलताना त्यांनी, हा प्रकल्प कोकणच्या जनतेच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. लोकांनी सोशल मीडियावरील संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करणाऱ्यांनी प्रथम या प्रकल्पाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी. हे सरकार सर्वसामान्यांचे नसून मोठ्या उद्योगपतींच्या हिताचे सरकार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

“अशा विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पांची गरज असेल तर ते गुजरातमध्ये उभारा; कोकणातील सुपीक भूमीवर आणि येथील जनतेवर ते लादू नका,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. कोकणातील जनतेची दिशाभूल आम्ही करत असल्याचा आरोप करणाऱ्यांवर पलटवार करत, समाजात तेच तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात आल्यास येथील आंबा-काजू बागायतदार, मच्छीमार आणि कोकणची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडेल, अशी भीती व्यक्त करत त्यांनी सर्व पक्ष, संघटना आणि नागरिकांनी एकजुटीने या प्रकल्पाला विरोध करण्याचे आवाहन केले.

सत्तेत असतानाही आणि विरोधात असतानाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकल्पाला विरोधाची भूमिका घेतली होती. गरज पडल्यास उद्धव ठाकरे यांना देवगडमध्ये आणून जनतेसमोर भूमिका मांडू आणि लोकशक्तीच्या बळावर हा प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प कोकणातून कायमचा हद्दपार करू, असा निर्धार सुशांत नाईक यांनी व्यक्त केला.

शेअर करा