देवगड, दि. २५ जुलै
देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबई संचलित शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण परिसर “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने आणि विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळा समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत शिंगाडे व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रविण खडपकर यांच्या हस्ते भगवान विठ्ठलाच्या प्रतिमेचे तसेच संतांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी विठ्ठल-रखुमाई व संत परंपरेप्रती श्रद्धा व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाई, वारकरी आणि संतांची आकर्षक वेशभूषा साकारून कार्यक्रमाची शोभा वाढवली. पारंपरिक पद्धतीने रिंगण घालण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि अभंग-भजनांच्या सुरावटीत शिस्तबद्ध दिंडी काढण्यात आली. रिंगण सोहळा पालखीसह शालेय परिसरात तसेच देवगड एसटी स्टँड या ठिकाणी दिंडी नेऊन तेथे देखील रिंगण सोडळा विद्यार्थ्यांनी सादर केला.दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी विठ्ठलनामाचा अखंड जयघोष करत वारकरी संप्रदायाची भक्तीपरंपरा जिवंत केली. या दिंडी मध्ये मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका ,सर्वशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संत साहित्य, वारकरी परंपरा आणि आषाढी एकादशीचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण आणि संस्मरणीय ठरला. या उपक्रमाचे संस्था पदाधिकारी, संस्थाचालक व पालक या सर्व स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.