१ जूनपासून सिंधुदुर्गात दोन महिने समुद्रात मासेमारी बंद
देवगड, दि.३० मे
समुद्रातील मासळी साठ्याचे संरक्षण आणि पावसाळी वादळी हवामानात मच्छीमारांच्या जीवित रक्षणासाठी शासनाने यंदा १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत पावसाळी मासेमारी बंदी जाहीर केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त (तांत्रिक) यांच्या निर्देशानुसार देवगडचे किरण वाघमारे, परवाना अधिकारी तथा सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, देवगड यांनी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, सागरी सुरक्षा रक्षक आणि सागरमित्र यांना याबाबत विशेष परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत.
बंदीचे मुख्य मुद्दे :
- ही बंदी सर्व यंत्रचलित आणि यांत्रिक नौकांना पूर्णपणे लागू राहील.
- पारंपरिक (बिगर-यंत्रचलित) नौकांना मात्र सवलत देण्यात आली आहे.
- सध्या समुद्रात असलेल्या सर्व यांत्रिक नौका ३१ मे २०२६ पूर्वी आपापल्या बंदरात परतणे बंधनकारक आहे.
- १ जूनपासून कोणत्याही यांत्रिक नौकेला बंदरावर मासे उतरवण्यास परवानगी दिली जाणार नाही.
- राज्याच्या सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांच्या आत बंदी काटेकोरपणे लागू राहील. खोल समुद्रात जाणाऱ्या नौकांवर केंद्र शासनाचे नियम लागू होतील.
दोन महिन्यांचा हा कालावधी माशांच्या प्रजोत्पादनाचा मुख्य काळ असल्याने बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मितीला चालना मिळेल आणि भविष्यात मासळीचा साठा वाढण्यास मदत होईल, असे मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे.
कठोर कारवाईचा इशारा :
बंदी काळात कोणतीही यांत्रिक नौका बेकायदेशीर मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम अंतर्गत ती नौका, उपसाधने आणि पकडलेली मासळी जप्त करण्यात येईल. तसेच संबंधित मालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
याशिवाय, बंदी काळात समुद्रात जाऊन अपघात झाल्यास शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत किंवा नुकसान भरपाई दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाने सर्व मच्छीमार सहकारी संस्था, नौका मालक आणि मच्छीमारांना शासकीय नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.