जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, बेकायदेशीर जमाव आणि शासकीय आदेशाचा अवमान केल्याचा आरोप; देवगड पोलिसांकडून पुढील तपास सुरू
.
देवगड, दि. ०७ जुलै
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मीठमुंबरी येथे जलसमाधी आंदोलन आयोजित केल्याप्रकरणी महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे नेते, बागायतदार संघटनांचे पदाधिकारी आणि इतर आंदोलनकर्त्यांविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड तालुक्यातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प रद्द करावा तसेच आंबा बागायतदारांना वाढीव नुकसानभरपाई मिळावी, या मागण्यांसाठी मीठमुंबरी समुद्रकिनारी जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते. मात्र, त्या वेळी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असतानाही मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केल्याने शासनाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणात खासदार राजू उर्फ देवाप्पा आण्णा शेट्टी, माजी खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, बागायतदार संघटनेचे अध्यक्ष आनंद ढोके,गणेश गावकर,गणेश वाळके,रामानंद वाळके,स्वप्नील तोडणकर,अजय नानेरकर,संजय आचरेकर,दिनेश धुवाळी,किरण टेंबुलकर,उमेश कुलकर्णी,सुशांत नाईक,प्रसाद दुखंडे,शरद परब,माजी आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळस्कर,उद्धव बाळासाहेब गटाचे तालुकाप्रमुख रवींद्र जोगल,मनसे चंदन मेस्त्री, धीरज घाडी, धीरज परब,डॉक्टर मंगेश सावंत,राजेंद्र गड्याळकर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असून इतर संबंधितांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १३५, ३७ तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम १८९(२), १९० आणि २२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे प्रकरण देवगड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रवींद्र महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आले असून पुढील तपास देवगड पोलीस करीत आहेत.