रखडलेली विकासकामे, सांडपाणी व पाणीपुरवठा समस्यांवर भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक; विरोधकांनी पूर्वी उठवलेल्या मुद्द्यांनाच आता सत्ताधाऱ्यांची कबुली?
देवगड,दि.२२ मे
देवगड-जामसंडे नगरपंचायतीतील रखडलेली विकासकामे, सांडपाणी समस्या, पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आणि मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्यानंतर अखेर सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांना मुख्याधिकाऱ्यांचे दार ठोठवावे लागल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे नगरपंचायतीवर सत्ता असतानाही विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला सूचना देण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर येत असेल, तर ही बाब सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील नागरिक रस्ते, सांडपाणी, गटारे, पाणीपुरवठा अशा मूलभूत समस्यांनी त्रस्त आहेत. विरोधकांनी वेळोवेळी या प्रश्नांवर आवाज उठवत नगरपंचायतीच्या कारभारावर टीका केली होती. मात्र त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र त्याच सत्ताधाऱ्यांना मुख्याधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन रखडलेल्या कामांचा आढावा घ्यावा लागत असल्याने विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य होते का? अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.
शहरातील अर्धवट विकासकामांमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असताना, सत्ताधाऱ्यांना इतक्या उशिरा जाग का आली? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. सांडपाणी समस्यांवर “तातडीने कार्यवाही” करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी इतके दिवस प्रशासन आणि सत्ताधारी नेमके काय करत होते? हा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.सत्ता हातात असताना विकासकामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना सुविधा देणे ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असते. मात्र त्याऐवजी प्रश्न चिघळल्यानंतर बैठका घेऊन प्रशासनाला सूचना देणे, हा केवळ दिखावा तर नाही ना? अशी टीकाही आता जोर धरू लागली आहे.दरम्यान, बैठकीतील सूचनांनंतर तरी रखडलेली कामे पूर्ण होणार की पुन्हा आश्वासनांचीच मालिका सुरू राहणार, याकडे देवगड-जामसंडेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
विशाल मांजरेकर यांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका
╚════════════════════════════╝
“देवगड-जामसंडे नगरपंचायतीवर सत्ता असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनाच जर रखडलेल्या विकासकामांसाठी मुख्याधिकाऱ्यांची भेट घ्यावी लागत असेल, तर ही सत्ताधाऱ्यांच्या अपयशाची कबुली आहे,” अशी घणाघाती टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक विशाल मांजरेकर यांनी केली आहे.
“गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिक सांडपाणी, पाणीपुरवठा, रस्ते आणि गटारांच्या समस्यांनी त्रस्त आहेत. विरोधकांनी वेळोवेळी हे प्रश्न उपस्थित केले, मात्र त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता जनतेचा रोष वाढल्यानंतर बैठका घेऊन प्रशासनाला सूचना देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
“सत्ता हातात असताना विकासकामे वेळेत पूर्ण करणे ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असते. मात्र कामे रखडल्यावर केवळ बैठका घेऊन फोटोसेशन करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामे पूर्ण करून दाखवावीत,” असा टोला विशाल मांजरेकर यांनी लगावला.