साडेसहा लाख लिटर क्षमतेची टाकी अखेर कार्यान्वित; शहरवासीयांच्या पाण्याच्या समस्येवर कितपत दिलासा मिळणार याकडे लक्ष
देवगड,दि.२६ मे
देवगड-जामसंडे शहराच्या पाणीटंचाईवर उपाय म्हणून अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या साडेसहा लाख लिटर क्षमतेच्या जलसाठा टाकीचा शुभारंभ नुकताच पाणीपुरवठा सभापती यांच्या हस्ते करण्यात आला. या टाकीमुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी प्रत्यक्षात शहरवासीयांची पाण्याची तहान भागणार का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
शहरात वारंवार होणाऱ्या पाणीपुरवठा विस्कळीततेमुळे नागरिक त्रस्त असून, अनेकदा “लाईन फुटली आहे, सहकार्य करा” असे मोबाईल संदेश नागरिकांना मिळत असल्याने पाणीपुरवठा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. नव्याने सुरू झालेल्या जलसाठा टाकीमुळे तरी शहरातील पाणीटंचाई आणि विस्कळीत पुरवठ्याचा प्रश्न सुटणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
जलसाठा टाकी सुरू;दहिबाव नळ योजनेसाठी निधी दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार
देवगड-जामसंडे शहरासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या साडेसहा लाख लिटर क्षमतेच्या जलसाठा टाकीतील पाणी नागरिकांनी सध्या पिण्यास वापरू नये, असे आवाहन पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांनी केले आहे. टाकीतील पाणी पूर्णपणे पिण्यायोग्य होण्यासाठी सुमारे आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
टाकीच्या शुभारंभप्रसंगी बोलताना चांदोस्कर म्हणाल्या की, सध्या शहरात नागरिकांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
मात्र नव्याने सुरू झालेली जलसाठा टाकी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर शहरवासीयांना एक दिवसाआड नियमित पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दहिबाव नळ योजनेच्या दुरुस्ती कामासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पाणीपुरवठा सभापती यांनी त्यांचे आभार मानले. या निधीमुळे पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेली ही जलसाठा टाकी अखेर सुरू झाल्याने शहराच्या पाणीप्रश्नावर काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असली तरी प्रत्यक्षात नागरिकांना कितपत नियमित व सुरळीत पाणीपुरवठा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.