देवगडमध्ये मासळी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून दूषित पाणी रस्त्यावर सोडू नका! मत्स्य परवाना अधिकारी किरण वाघमारे

शेअर करा

मत्स्यव्यवसाय विभागाचा वाहनचालक व मालकांना इशारा; नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई

देवगड,दि.१५ ऑक्टोंबर

मासळी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून रस्त्यावर दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी सोडले जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या पाण्यामुळे रस्ते निसरडे होऊन दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर देवगड येथील सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी यांनी संबंधित वाहनचालक व वाहनमालकांना आवश्यक सूचना देत नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
मासळी ताजी ठेवण्यासाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फाचा वापर केला जातो. मात्र, बर्फ वितळल्यानंतर तयार होणारे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी योग्य खबरदारी न घेतल्यास रस्त्यावर सांडते. त्यामुळे रस्ते निसरडे होण्याबरोबरच परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो.
यापूर्वी अशा प्रकारच्या घटनांमध्ये दुचाकीस्वार घसरून अपघात झाल्याच्या बाबी समोर आल्या आहेत. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊन गंभीर अपघात किंवा अन्य अडचणी उद्भवू नयेत, यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने प्रतिबंधात्मक सूचना जारी केल्या आहेत.
या सूचनांनुसार, मासळी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून बर्फ वितळून तयार होणारे दूषित पाणी सार्वजनिक रस्त्यांवर, नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत क्षेत्रात सोडता येणार नाही. मासळीच्या पाण्याची विल्हेवाट संबंधित नगरपंचायत किंवा ग्रामपंचायतीच्या निर्देशानुसार योग्य ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. तसेच वाहनातील बर्फ व मासळी वाहतूक करताना योग्य प्रकारे झाकून सुरक्षिततेची काळजी घ्यावी, जेणेकरून पाणी रस्त्यावर सांडणार नाही.
सार्वजनिक रस्त्यांच्या दुतर्फा तसेच मानवी वस्तीत दुर्गंधी निर्माण करणारे किंवा अपघातास कारणीभूत ठरू शकणारे दूषित पाणी सोडण्यासही मनाई करण्यात आली आहे.
संबंधित संस्थांनी या सूचनांची माहिती मासळी वाहतूक करणाऱ्या वाहनचालक व मालकांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित वाहनमालक, चालक किंवा वाहतूकदार यांच्यावर वाहतूक पोलिसांमार्फत कारवाई केली जाऊ शकते.
नागरिकांचे आरोग्य आणि रस्त्यावरील सुरक्षितता लक्षात घेऊन मासळी वाहतूकदारांनी या सूचनांचे तात्काळ व काटेकोर पालन करावे, असे आवाहन देवगडच्या सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी यांनी केले आहे.

शेअर करा