देवगड तालुक्यातील तीन मंडळांना आंबा विमा योजनेचा लाभ द्या; शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पाठपुरावा

शेअर करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्तक्षेपानंतर विमा कंपनी, हवामान केंद्र व कृषी विभागाला तातडीने दुरुस्तीचे आदेश

देवगड,दि.०४ जुन

देवगड तालुक्यातील पडेल,बापर्डे आणि देवगड या तीन मंडळांना आंबा पीक विमा योजनेतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या निर्णयाचा फटका हजारो आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, याबाबतचा प्रश्न तातडीने संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आला आहे.

सन २०२५-२६ हंगामात अवकाळी हवामान आणि उष्णतेच्या परिणामामुळे आंबा मोहोर जळून गेला. परिणामी देवगड तालुक्यातील सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नियमितपणे विमा हप्ता भरूनही नुकसानभरपाईपासून वंचित राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

या संदर्भात पंचायत समितीच्या सभेत विषय उपस्थित करून वगळण्यात आलेल्या तीन मंडळांचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली. विमा कंपनी, हवामान केंद्र आणि कृषी विभागाने दिलेली कारणे चुकीची असून त्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून संबंधित मंडळांतील शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

या गंभीर प्रश्नाची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालय स्तरावर संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच विमा कंपनी, हवामान केंद्र आणि कृषी विभागाला आवश्यक दुरुस्ती करून पडेल,बापर्डे आणि देवगड मंडळांतील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तिन्ही मंडळांतील शेतकऱ्यांना विमा लाभ मिळावा यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाहीही पंचायत समिती सभापती गणेश राणे यांनी दिली

शेअर करा