देवगड : गरजू विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांकडून गणवेश व दप्तरांचे वाटप

शेअर करा

देवगड ,दि.३० जुलै
सामाजिक बांधिलकी जपत श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक (व्याव.) विद्यालय, जामसंडे प्रशालेच्या सन २००५–२००६ च्या एस.एसी.सी. बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सहा गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व दप्तरांचे वाटप करून समाजापुढे आदर्श निर्माण केला.

या उपक्रमासाठी माजी विद्यार्थी श्री. निनाद देशपांडे व श्री. गौरव गोगटे हे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व दप्तरांचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणात सातत्य, कठोर परिश्रम आणि उच्च ध्येय ठेवून प्रगती करण्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील जाधव यांनी माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करताना सांगितले की, “शाळेने दिलेल्या संस्कारांची जपणूक करत आपल्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करणारे माजी विद्यार्थी हे विद्यालयाचे खरे वैभव आहेत. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक साहित्यच मिळत नाही, तर समाजात संवेदनशीलतेचे आणि कृतज्ञतेचेही संस्कार रुजतात.”

यावेळी त्यांनी सन २००५–२००६ च्या एस.एसी.सी. बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले तसेच भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

माजी विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले.

शेअर करा