देवगड हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी हाडांच्या घनता तपासणीचे आरोग्य शिबिर

शेअर करा

किशोरवयीन मुलांमधील हाडांच्या आरोग्याबाबत जनजागृती; १४० विद्यार्थ्यांसह शिक्षक-कर्मचाऱ्यांनी घेतला मोफत तपासणीचा लाभ

देवगड ,दि.१६ जुलै

देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हाडांच्या घनता (Bone Mineral Density) तपासणीचे विशेष मोफत आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. मँगो सिटी डॉक्टर्स असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड, मॅक्लाउड्स फार्मास्युटिकल्सच्या ऑस्टेवा विभाग आणि डॉ. दत्तप्रसाद सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाचा सुमारे १४० विद्यार्थी तसेच शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.

किशोरवयातच हाडांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा प्रकारचे किशोरवयीन मुलांसाठीचे शिबिर प्रथमच शेठ म ग हायस्कूल देवगड ने आयोजित केले. वाढत्या वयात हाडे मजबूत राहावीत आणि भविष्यात ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांचा धोका कमी व्हावा, यासाठी या तपासणीचे महत्त्व डॉक्टरांनी उपस्थितांना समजावून सांगितले.

शिबिराचे उद्घाटन देवगडमधील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ व स्थानिक समितीचे अध्यक्ष डॉ. के. एन. बोरफळकर यांच्या हस्ते झाले. त्यांनी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. दत्तप्रसाद सावंत यांनी शिबिरामागील उद्देश स्पष्ट केला, तर डॉ. स्वप्नील शिंगाडे आणि डॉ. धनंजय भिडे यांनीही विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती दिली.

यावेळी रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडच्या अध्यक्षा रो. अनुश्री पारकर, सचिव रो. दयानंद पाटील, माजी अध्यक्ष रो. गौरव पारकर, खजिनदार रो. अनिल गांधी, रो. विजय बांदिवडेकर तसेच मॅक्लाउड्स फार्मास्युटिकल्सचे प्रतिनिधी आणि तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, शिक्षक, कर्मचारी, मँगो सिटी डॉक्टर्स असोसिएशन आणि रोटरी क्लबने विशेष सहकार्य केले.

शेअर करा