आंबा-काजू बागायतदारांच्या न्याय्य मागण्यांसाठी मिठमुंबरी बागवाडी येथे आंदोलन; राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आयोजन.
देवगड ,दि.३० जून
बागायतदारांच्या न्याय्य मागण्यांसाठी व देवगड येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी आंबा, काजू बागायतदार व व्यापारी महासंघाच्यावतीने ३ जुलै रोजी सकाळी १० वाजता मिठमुंबरी बागवाडी येथील समुद्रकिनारी भव्य मेळावा व जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष काका ढोके व गणेश गावकर यांनी दिली.
काका ढोके म्हणाले, कोकणातील बागायतदारांच्या न्याय्य मागण्यांबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलन, मोर्चा काढूनही सरकारचे डोळे उघडले नाहीत. बागायतदारांना प्रतिहेक्टरी पाच लाख रूपये अर्थात प्रतिगुंठा पाच हजार रूपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती. या मागणीत तडजोड शक्य होती. परंतु प्रतिकलम २२० रूपयांची नुकसानभरपाई देत शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने फुसली आहेत. त्यामुळे बागायदारांनी आता टोकाची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. जीव जाऊनच बागायतदार शेतकऱ्याला न्याय मिळणार असेल, तर शेतकरी जीव द्यायला तयार आहेत. यासाठी ३ जुलै रोजी सकाळी १० वाजता देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी भव्य जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी देवगडमध्ये प्रस्तावित असलेला व सध्या संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाबाबतही आंदोलनस्थळी एका जाहीर मेळाव्यातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प हा केवळ देवगड- मुणगेवासियांसाठीच महत्वाचा नसून सिंधुदुर्ग व समस्त कोकणसाठीही महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या आंदोलनात जास्तीत जास्त बागायतदारांनी, ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
गणेश गावकर म्हणाले, सिंधुदुर्गातीलच नव्हे, तर कोकण किनारपट्टीतील बागायतदार आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने रस्त्यावरची लढाई लढत आहे. परंतु सरकारला मदत करण्याची जाणीव या सरकारमध्ये नसल्याचे दिसून येत आहे. तसेच देवगड- मुणगे येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प हा केवळ एका गावाचा अथवा तालुक्याचा प्रश्न नसून तो कोकण किनारपट्टीचा प्रश्न आहे. म्हणूनच ही रस्त्यावरची लढाई आपल्याला लढायची आहे. अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करून सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी तसेच कोकणातील बागायतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी या आंदोलनात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या आंदोलनात उबाठा शिवसेनेचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत, माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या आंदोलनाला सिंधुदुर्ग मनसेनेही जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. तसेच अणुऊर्जा प्रकल्पाविरोधी विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्ष, पर्यावरणवादी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. अणुऊर्जा प्रकल्पाचे अभ्यासक डॉ. मंगेश सावंत हे अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात मार्गदर्शन करण्यासाठी आंदोलनस्थळी उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी खासदार विनायक राऊत, माजी मंत्री महादेव जानकर हेदेखील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती काका ढोके व गणेश गावकर यांनी दिली. यावेळी शरद परब उपस्थित होते.