देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या सभेत निधीच्या वापरावरून प्रशासनाला जाब

शेअर करा

स्वनिधीतील ४० टक्के रक्कम विकासकामांसाठी का उपलब्ध होत नाही? प्रणाली माने यांचा सवाल

नगरपंचायतीमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप नगरसेवक निवृत्ती तारी यांनी केला

देवगड,दि.३० सप्टेंबर

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नगरपंचायतीतील कामकाज, निधीचा वापर आणि स्वनिधीच्या उपलब्धतेवरून नगरसेवकांनी प्रशासनाला जाब नगरसेविका प्रणाली माने यांनी विचारला. असून नगरपंचायतीमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप नगरसेवक निवृत्ती तारी यांनी केला. कर्मचाऱ्यांच्या वेतनातूनही पैसे घेतले जात असल्याचा दावा त्यांनी सभागृहात केला.
नगरपंचायतीच्या स्वनिधीतून नगरसेवकांना विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा नगरसेविका प्रणाली माने यांनी उपस्थित केला. नगरसेवकांना स्वनिधीतील ४० टक्के रक्कम वापरण्याचा अधिकार असताना ही रक्कम उपलब्ध का करून दिली जात नाही, असा सवाल त्यांनी केला. स्वनिधीचा वापर नेमका कुठे केला जातो, याबाबतही त्यांनी प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले.

देवगड-जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्षा मिताली सावंत, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोसकर, स्वच्छता सभापती निवृत्ती तारी, बांधकाम सभापती रोहन खेडेकर, मुख्याधिकारी हरिदत्त माने यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

महाराष्ट्रात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने आगामी काळात देवगड-जामसंडे शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन ज्या ठिकाणी पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी आतापासूनच लोकसहभागातून बंधारे उभारण्यात यावेत, अशी मागणी पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोसकर यांनी सभागृहात केली. जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याचा साठा वाढविण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरपंचायत हद्दीतील प्रस्तावित नवीन नळपाणीपुरवठा योजनेसाठी तांत्रिक तपासणी शुल्क भरण्याबाबत सभेत चर्चा झाली. यासाठी १ कोटी १६ लाख १० हजार ५ रुपये रक्कम असल्याचे सांगण्यात आले. ही रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्याबाबत सर्व नगरसेवकांनी मान्यता दिली.


नगरपंचायतीतील कामकाज आणि निधीच्या वापराबाबतही सभेत काही नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. नगरपंचायतीमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप नगरसेवक निवृत्ती तारी यांनी केला. कर्मचाऱ्यांच्या वेतनातूनही पैसे घेतले जात असल्याचा दावा त्यांनी सभागृहात केला.

नगरपंचायत हद्दीत मोकाट गुरांसाठी उभारण्यात आलेल्या कोंडवाड्याबाबत मागील बैठकीत निवृत्ती तारी यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला होता. त्यावेळी ठरावातील ‘स्वखर्चाने’ हा शब्द का वगळण्यात आला, असा सवाल नगरसेवक नितीन बांदेकर यांनी उपस्थित केला.

नगरपंचायतीच्या स्वनिधीतून नगरसेवकांना विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याचा मुद्दाही नगरसेविका प्रणाली माने यांनी उपस्थित केला. नगरसेवकांना स्वनिधीतील ४० टक्के रक्कम वापरण्याचा अधिकार असताना ही रक्कम उपलब्ध का करून दिली जात नाही, असा सवाल त्यांनी केला.

देवगड-जामसंडे शहरात डासांचे प्रमाण वाढल्याने साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे फॉगिंग मशीनसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक नितीन बांदेकर यांनी केली.


नगरपंचायत हद्दीत सुरू असलेल्या विकासकामांच्या ठिकाणी लावण्यात येणारे कामाचे फलक कायमस्वरूपी नसून केवळ फोटोसेशनपुरते लावले जात असल्याचा आरोपही बांदेकर यांनी केला. शहरात उभारण्यात आलेले वॉटर एटीएम येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

देवगड-जामसंडे शहराच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. ही झाडी तातडीने हटवावी, अशी मागणी स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी केली. जर हा भाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असेल तर नगरपंचायतीमार्फत कर कशासाठी आकारला जातो, असा सवालही त्यांनी केला. यावर अपघाताचा धोका असलेल्या ठिकाणची झाडी तत्काळ कापण्याचे आदेश मुख्याधिकारी हरिदत्त माने यांनी दिले.


गणेश चतुर्थीपूर्वी शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात गणेश चतुर्थीच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. चतुर्थीपूर्वी करण्यात आलेले नियोजन कुठे गेले, असा सवाल कावले यांनी उपस्थित केला.

गणेश चतुर्थीच्या कालावधीत काही प्रभागांमध्ये पथदिवे बंद असल्याने अंधाराचे वातावरण होते, असा मुद्दा नगरसेविका प्रणाली माने यांनी उपस्थित केला. प्रशासनाकडून केवळ वेळ मारून नेण्याचे काम होत असून, त्याचा रोष मात्र नगरसेवकांना जनतेसमोर सहन करावा लागतो, असे नगरसेवक निवृत्ती तारी यांनी सांगितले.


नगरपंचायत इमारतीच्या नूतनीकरणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्यास त्याबद्दल अभिनंदनाचा ठराव घ्यावा, अशी मागणी नितीन बांदेकर यांनी केली.

राष्ट्रीय किनारा अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्त १९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या किनारा स्वच्छता मोहिमेच्या खर्चाचा सविस्तर तपशील सभागृहासमोर सादर करावा, अशी मागणी प्रणाली माने यांनी केली. या मोहिमेसाठी खर्च झालेल्या १ लाख ३५ हजार रुपयांचा खर्च कोणत्या बाबींवर करण्यात आला, याचा तपशील सादर केल्याशिवाय विषय पटलावर घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले.

देवगड-जामसंडे नगरपंचायतीस घनकचरा व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी अथवा भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून घेण्याबाबतही चर्चा झाली. विकास आराखड्यात डम्पिंग ग्राउंडसाठी दाखविण्यात आलेल्या जागेच्या मालकाशी चर्चा करून ती जागा उपलब्ध होऊ शकते का, याची पाहणी करण्याची सूचना निवृत्ती तारी यांनी केली.


नगरपंचायतीच्या मालकीची जुनी घंटागाडी दुरुस्त करून त्यावर पाण्याची टाकी बसविण्याच्या प्रस्तावाला सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. नगरपंचायत अभिलेख कक्ष सुस्थितीत ठेवण्यासाठी लोखंडी रॅक खरेदी करण्याच्या विषयावरही चर्चा झाली. यासाठी स्वनिधी उपलब्ध नसल्यास निधी कुठून उपलब्ध करणार, असा सवाल प्रणाली माने यांनी केला.

नगरपंचायतीला पाणीपुरवठा करणाऱ्या दहिबाव नळपाणी योजनेच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. संबंधित कामगारांना किमान वेतनाप्रमाणे वेतन देण्यात यावे, अशी मागणी सभागृहात करण्यात आली.


देवगड पवनचक्की गार्डनमध्ये येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश शुल्क आकारण्याच्या विषयावरही चर्चा झाली. हा विषय चार वर्षांपूर्वी सभागृहात मांडण्यात आला होता. त्यावेळी विरोध झाल्याने चार वर्षांचा महसूल बुडाला, त्याला जबाबदार कोण, असा सवाल नितीन बांदेकर यांनी उपस्थित केला. मात्र, गार्डनमध्ये पर्यटकांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध झाल्यानंतरच प्रवेश शुल्क आकारण्यात यावे, अशी सूचना निवृत्ती तारी यांनी केली.


नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत पाणीटंचाई, पाणीपुरवठा योजना, स्वनिधी, स्वच्छता, डास प्रतिबंधक उपाययोजना, वाहतूक व्यवस्था, पथदिवे, घनकचरा व्यवस्थापन, विकासकामे तसेच पर्यटनविषयक विविध प्रश्नांवर नगरसेवकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

शेअर करा