“स्वच्छ सर्वेक्षण २०२५” आणि “माझी वसुंधरा अभियान ७.०” अंतर्गत जनजागृतीसह प्लास्टिक जप्ती मोहीम
देवगड,दि.२२ मे
देवगड-जामसंडे नगरपंचायतीतर्फे “स्वच्छ सर्वेक्षण २०२५” तसेच “माझी वसुंधरा अभियान ७.०” अंतर्गत शहरात विशेष प्लास्टिक बंदी जनजागृती आणि तपासणी मोहीम राबविण्यात आली. शुक्रवार बाजाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये व्यापारी आस्थापनांची तपासणी करून बंदी असलेले प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले.
शासनाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली असून, विशेषतः १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरास मनाई करण्यात आली आहे. या आदेशानुसार मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने देवगड सडा भाग १ व २ तसेच बाजार परिसरात कारवाई केली. व्यापाऱ्यांना प्लास्टिकचा वापर टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या मोहिमेदरम्यान नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. प्लास्टिकमुळे पर्यावरण, समुद्र आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगत कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
नगरपंचायतीने भविष्यातही अशा धडक मोहिमा सुरू ठेवण्याचा इशारा देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. या मोहिमेत नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.