देवगड : नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ देवगडात महाविकास आघाडीचा एल्गार

शेअर करा

विद्यार्थ्यांना न्याय, दोषींवर कठोर कारवाई आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन; विद्यार्थी व पालकांना सहभागी होण्याचे आवाहन

देवगड,दि.२२ जुलै

देशभरात गाजत असलेल्या नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या कथित अन्यायाविरोधात देवगड तालुका महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी, २३ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता तहसीलदार कार्यालयासमोर निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवक तालुकाप्रमुख गणेश गावकर, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष किरण टेंबुलकर, मनसे तालुकाध्यक्ष संतोष मयेकर आणि उपतालुकाध्यक्ष स्वाती सावंत यांनी भूमिका मांडली. नीट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचा परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत झाला असून, दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटींवर टीका करत परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याची गरज व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारत संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली. देशभरातून या प्रश्नावर उमटणाऱ्या जनआक्रोशाला पाठिंबा देण्यासाठी देवगडातील हे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेअर करा