वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध गट, अधिकारी, कर्मचारी, उपजीविका तज्ञ व प्रकल्प समन्वयकांचा गौरव
देवगड,दि.२८ जुलै
आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त कांदळवन प्रतिष्ठानतर्फे आयोजित कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार वितरण सोहळा – २०२६ हा कार्यक्रम २७ जुलै रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्र, नरीमन पॉईंट येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कांदळवन संवर्धन, संरक्षण आणि जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध गट, अधिकारी, कर्मचारी तसेच उपजीविका तज्ञ व प्रकल्प समन्वयकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा. गणेश नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी अपर मुख्य सचिव (वने) मा. मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) मा. एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मा. श्रीनिवास रेड्डी, मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष, मुंबई) तथा कांदळवन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक मा. एन. आर. प्रविण, उपवनसंरक्षक (कांदळवन कक्ष, मुंबई) तथा कांदळवन प्रतिष्ठानच्या सहसंचालक श्रीमती मधुमिथा एस., सामाजिक वनीकरण विभागाचे मा. एन. आर. खाडे, मा. मल्लिकार्जुन, मा. रामाराव रेड्डी, मा. रविकिरण गोवेकर, विभागीय वनाधिकारी (कांदळवन, दक्षिण कोकण) सौ. कांचन पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी (कांदळवन विभाग, मालवण) मा. महादेव शिंगाडे, मा. जयेश विश्वकर्मा, मा. सुशांत सनये, मा. माळी, उपजीविका तज्ञ केदार पालव तसेच प्रकल्प समन्वयक पूजा लुटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी कांदळवन प्रतिष्ठान व कांदळवन कक्षातील अधिकारी-कर्मचारी, पुरस्कार प्राप्त विविध गट, उपजीविका तज्ञ, प्रकल्प समन्वयक तसेच वन विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पुरस्कार विजेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांदळवन संवर्धनासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांचा सन्मान करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधिक बळकट करण्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.