देवगड : “अणुऊर्जा नव्हे, पर्यावरणपूरक उद्योगच देवगडच्या विकासाचा मार्ग” – उद्योजक नंदकुमार घाटे

शेअर करा

आंबा-काजू बागायतदारांच्या जलसमाधी आंदोलनाला जाहीर पाठिंबा; प्रकल्पाच्या परिणामांवर सविस्तर चर्चा

देवगड,दि.०२ जुलै
देवगड तालुक्यात अणुऊर्जा प्रकल्पासारखे मोठे औद्योगिक प्रकल्प उभारल्यास त्याचा विपरीत परिणाम येथील आंबा, काजू आणि मत्स्य व्यवसायावर होईल. या नैसर्गिक संपत्तीवर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असून अशा प्रकल्पांमुळे अनेक शेतकरी व मच्छीमार आर्थिक संकटात सापडतील. त्यामुळे देवगडच्या पर्यावरणाशी सुसंगत आणि स्थानिकांना रोजगार देणारे पर्यावरणपूरक प्रकल्पच तालुक्यात आणावेत, असे मत उद्योजक नंदकुमार घाटे यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी आंबा-काजू बागायतदार संघटनेच्या वतीने ३ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. देवगडच्या पर्यावरण, शेती आणि मत्स्य व्यवसायाचे संरक्षण करण्यासाठी हे आंदोलन आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला आंबा-काजू बागायतदार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांच्यासह गणेश गावकर, किरण तेबुलकर, चंदन दळवी, चंदन मामघाडी, तिमिर माणगावकर, प्रशांत शिंदे, गणेश वाळके, शरद परब आदी बागायतदार उपस्थित होते.
बैठकीत प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रकल्पामुळे शेती, फळबागा, मत्स्य व्यवसाय आणि पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत उपस्थितांनी चिंता व्यक्त केली. तसेच देवगडची नैसर्गिक ओळख आणि येथील पारंपरिक व्यवसाय अबाधित राखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.

शेअर करा