देवगड : ३ जुलैच्या जलसमाधी आंदोलनात सहभागी व्हा; राजू शेट्टींचे आवाहन

शेअर करा

नुकसानभरपाई अपुरी असल्याची टीका; देवगड अणुऊर्जा प्रकल्पामुळे आंबा-काजू बागायती धोक्यात येतील, असा दावा करत शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन.

देवगड,दि.२९ जून
प्रतिकलम २२० रूपये नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने फुसण्याचे काम शासनाने केले आहे. मोर्चा, आंदोलने करूनही हे मूर्दाड सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाही. कोकणच्या पर्यावरणाचे संतुलन आधीच बिघडलेले असताना देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्प सरकारने प्रस्तावित केला आहे. हा प्रकल्प झाल्यास कोकणात शिल्लक राहिलेली आंबा, काजूची बागायती नाहीशी होऊन जाईल. कोकणचा कॅलिफोर्निया नव्हे, कोकणचे राजस्थान होईल. सरकार न्याय देणारच नसेल तर जलसमाधी घेऊनच आम्ही आमचा शेवट करून घेऊ, अशी टोकाची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे ३ जुलै देवगड येथे होणाऱ्या जलसमाधी आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहे.
श्री. शेट्टी म्हणाले, गेल्या चार महिन्यांपासून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त करतोय. कारण वातावरणातील झालेल्या बदलांमुळे आंब्याला फळधारणा झाली नाही. काजूचीही तिच अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक आपत्ती समजून राज्य व केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापन निधीमधून भरीव निधी देणे गरजेचे होते. विमा कंपन्यांनीही विम्याची भरघोस मदत शेतकऱ्यांना मिळवून देणे गरजेचे होते. परंतु केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही व विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. प्रतिकलम २२० रूपये नुकसानभरपाई देऊन शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने फुसण्याचे काम केले आहे. अशावेळी अनेक प्रकारची आंदोलने केली. मोर्चा काढले. रास्ता रोको केले. मेळावे घेतले. तरीही हे मूर्दाड सरकार जर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाही. देवगड तालुक्यात आता अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असून हा प्रकल्प झाल्यास देवगडच्या पर्यावरणाचे वाटोळे होईल. आधीच पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने आंब्याचे उत्पादन येईनासे झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये अणुऊर्जा प्रकल्प येथे आला, तर कोकणच्या शेतकऱ्याने आंबा, काजू, कोकम ही पिके आता विसरून जायला पाहिजे. एकतर भातशेती संपल्यात जमा आहे. कोकणात जी शेती शिल्लक आहे, ती आंबा, काजूची आहे. तेही पीक नाहीसे झाले, तर संपूर्ण कोकण गुजार होईल. कोकणचा कॅलिफोर्निया करायचे सोडाच, कोकणचा राजस्थान होईल. ज्याचे कोकणवर नितांत प्रेम आहे, मग तो मुंबईत राहणारा असो की कोकणात राहणारा असो ! ही कोकणची भूमी अशीच हिरवीगार राहिली पाहिजे, असं ज्याला वाटते, त्याने ३ जुलै रोजी सकाळी १० वाजता देवगड येथे यावे. हे सरकार आम्हाला न्याय देणार नसेल, तर जलसमाधी घेऊनच आम्ही आमचा शेवट करून घेऊ, अशी टोकाची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. ‘गड्या तू एकटा नाहीस, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत’ या संदेशातून शेतकऱ्यांच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शेअर करा