गरजू व वंचित घटकांपर्यंत मदतीचा खारीचा वाटा पोहोचवणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी; संपत्ती नव्हे तर समाजसेवाच माणसाला अमरत्व देते.
देवगड,दि.०१ जुन
“आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. भगवंताने आपल्याला भरभरून दिले आहे, त्यातील खारीचा वाटा गरजू आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. आयुष्य संपताना माणूस कोणतीही संपत्ती सोबत घेऊन जात नाही. त्यामुळे समाजासाठी केलेले कार्यच खऱ्या अर्थाने कायम स्मरणात राहते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक तथा दानशूर व्यक्तिमत्त्व नंदकुमार (नंदूशेठ) घाटे यांनी केले.
त्यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देवगड येथील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात हा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच नंदूशेठ घाटे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य नागरिक उपस्थित होते.
नंदूशेठ घाटे हे केवळ यशस्वी उद्योजक म्हणूनच नव्हे, तर समाजाभिमुख आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जातात. शिक्षण, सामाजिक उपक्रम, गरजूंना मदत, धार्मिक आणि सार्वजनिक कार्यांसाठी त्यांनी वेळोवेळी उदार हस्ते योगदान दिले आहे. अनेकांना संकटाच्या काळात आधार देत त्यांनी समाजात आपुलकीचे नाते निर्माण केले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नंदूशेठ घाटे यांनी आयुष्यभर जपलेली समाजसेवेची भूमिका, लोकांप्रती असलेली आत्मीयता आणि विविध क्षेत्रांत दिलेले योगदान याचा गौरव केला. त्यांच्या कार्यातून समाजातील अनेकांना प्रेरणा मिळत असून, त्यांनी उभारलेला आदर्श भावी पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारा असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात नंदूशेठ घाटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. त्यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी उपस्थितांनी सदिच्छा व्यक्त केल्या.यावेळी अभय बापट,सुरेश सोनटक्के, विलास रूमडे, शामल जोशी यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
यावेळी दिवाकर परब,शामकांत शेडगे,अभय बापट,प्रदीप राऊत, निलेश पेडणेकर,जयराम कदम, श्रीकृष्ण कदम,शरद शिंदे,दिनेश मिस्त्री,ज्ञानदेव भडसाळे,सुधीर मांजरेकर,सुरेश सोनटक्के,शरद लाड,जितेंद्र पिसे,अश्विनी मोहिते, शामल जोशी,विलास रूमडे, विश्वनाथ तेली,अनिल तेली, प्रकाश गुरव,उदय रूमडे, शिवराम निकम, गुरु वाडेकर,शंकर नाणेरकर, विजय घाडी,अशोक कदम, प्रदीप कदम, पुनम मुनगेकर,भाई आचरेकर तसेच देवगड रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी हेदेखील उपस्थित होते.