देवगड : जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शेठ म. ग. हायस्कूलचे घवघवीत यश

शेअर करा

देवगड,दि.०४ सप्टेंबर

क्रीडासंकुल, ओरोस येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत शेठ म. ग. हायस्कूल, देवगडच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रशालेचे नाव उज्ज्वल केले.

१७ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात कु. विराज विनोद चौगुले याने ७१ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, कु. शमिका अतुल वाडकर हिने ५९ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक, तर कु. कल्पित महेश राणे याने ५६ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक मिळवला.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे विराज विनोद चौगुले आणि शमिका अतुल वाडकर यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे पालक, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था पदाधिकारी, शाळा समिती अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे,प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण खडपकर ,पर्यवेक्षिका सौ. निशा दहिबावकर ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकवर्ग यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावामुळे प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

शेअर करा