महाआरती, अभिषेक आणि इतिहास व्याख्यानातून शिवचरित्राचा गौरव; शिवप्रेमींची मोठी उपस्थिती
देवगड,दि.२७ जून
सकल हिंदू समाज, देवगड-जामसंडे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५३ व्या वर्धापनदिनानिमित्त देवगड येथे भव्य महाआरती व अभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सेवानिवृत्त सैनिक प्रकाश खाडीलकर यांच्या हस्ते अभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी इतिहास अभ्यासक रणजीत हिर्लेकर यांनी छत्रपती शिवाजी Maharaj यांच्या कार्याचा आणि इतिहासाचा सखोल आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचे स्वराज्य स्थापनेचे ध्येय आणि हिंदवी स्वराज्याची संकल्पना आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


या प्रसंगी माजी आमदार अजित गोगटे, सेवानिवृत्त सैनिक प्रकाश खाडीलकर, ललित चांदोस्कर, सिद्धेश घाडी, नगरसेवक शरद टुकुरूल, उबाठा शिवसेना नगरसेवक विशाल मांजरेकर, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र भुजबळ, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, माजी नगरसेवक योगेश चांदोस्कर, संजय तारकर,महेश कानकेकर यांच्यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललित चांदोस्कर यांनी केले, तर सूत्रसंचालन राजेंद्र परुळेकर यांनी केले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक व शिवभक्त सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि इतिहास संवर्धनाचा संदेश यावेळी देण्यात आला.