सुरेश गवस यांचे आवाहन; सावंतवाडी जिल्हा परिषद शाळा क्र. ५ ला साऊंड सिस्टिम, पंख्यांची भेट…
सावंतवाडी,दि.२९ ऑक्टोंबर
मराठी शाळा ही आमच्यासाठी मंदिर असून, त्यांना पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन आम्ही यशस्वी झालो, त्यामुळे पालकांनी आपली मानसिकता बदलून मुलांना मराठी शाळांमध्ये प्रवेश द्यावा, असे आवाहन माडखोल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक तथा माजी विद्यार्थी सुरेश गवस यांनी केले.
सावंतवाडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ येथे पत्रकार कै. बबन गवस यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू सुरेश गवस यांच्या माध्यमातून साऊंड सिस्टिम भेट देण्यात आली. तसेच माजी विद्यार्थी मुनाफ शेख यांनी वडील पिरसाब शेख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तीन पंखे व अन्य वस्तू शाळेला भेट दिल्या. या वस्तूंचे वितरण नुकतेच करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव माजी केंद्रप्रमुख रवींद्र गवस माजी विदयार्थी अमोल टेंबकर,मुख्याध्यापक शुभलता सुकी रश्मी पावस्कर आदी उपस्थित होते
यावेळी गवस पुढे म्हणाले मराठी शाळेतून शिक्षण घेताना कोणतीही कमतरता जाणवली नाही. त्यामुळे मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शिक्षक, शासन आणि पालकांनी एकत्रित प्रयत्न करावेत. माजी विद्यार्थी संघाकडून शाळेच्या विकासासाठी सुरू असलेले काम कौतुकास्पद असून, अधिकाधिक माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असेही गवस यांनी सांगितले.
माजी नगरसेवक विलास जाधव यांनी शाळेला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी शाळा दत्तक घेतली आहे शाळेतील स्वच्छतागृहांसह अन्य समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, शाळेत बालवाडी सुरू करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती दिली.
यावेळी शाळेला चांगले दिवस आणण्यासाठी येथील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मात्र शौचालय आणि बालवाडी चा प्रश्न मोठा आहे तो सुटल्यास निश्चितच शाळेची पटसंख्या वाढण्यास मदत होईल असा दावा केला त्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे त्यांनी आवाहन केले