देवगड : तारामुंबरी येथे श्री संत सोपानकाकांच्या पायी वारीची २७ जुलै रोजी सांगता; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

शेअर करा

ब्राह्मणदेव मंदिरापासून वारीचे प्रस्थान; गंगापूजन, वीणापूजन, महाप्रसाद आणि कीर्तनाने होणार समारोप

देवगड,दि.२६ जुलै

देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र तारामुंबरी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री संत सोपानकाकांच्या पायी वारीची सांगता सोमवार, दि. २७ जुलै रोजी भक्तिमय वातावरणात होणार आहे. या सोहळ्यास वारकरी, भाविक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर व पायी वारी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता श्री ब्राह्मणदेव मंदिर येथे वारकऱ्यांच्या आगमनाने होणार असून, तेथून पायी वारीचे श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर, तारामुंबरीकडे प्रस्थान होईल. मंदिरात आगमनानंतर गंगापूजन आणि वीणापूजन हा धार्मिक विधी पार पडणार आहे.

त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ७ वाजता सांजआरती आणि ७.१५ वाजता हरिकीर्तन होणार आहे. या कीर्तनाने पायी वारीची विधिवत सांगता करण्यात येणार आहे.

वारकरी परंपरेचा गौरव आणि विठ्ठल भक्तीचा संदेश जपणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात भाविकांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर व पायी वारी समितीचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

शेअर करा