शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली; पंचनामे व मदतीसाठी तातडीने कार्यवाहीच्या कृषी विभागाला सूचना
देवगड,दि.३० सप्टेंबर
कुणकेश्वर जिल्हा परिषद मतदारसंघातील कुणकेश्वर आणि कातवण परिसरामध्ये पाऊस न पडल्याने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य सुनीलभाई पारकर यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष जात नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली.
पाहणीदरम्यान संबंधित गावांतील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून भातशेतीच्या नुकसानीची माहिती घेण्यात आली. शेतकरी वर्गाचे झालेले हे नुकसान लक्षात घेता, नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पंचनामे तसेच आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले असून, बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर यांनी स्पष्ट केले.
या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांच्या समवेत पंचायत समिती सभापती गणेश राणे, कुणकेश्वरचे सरपंच महेश ताम्हणकर, भाजप सरचिटणीस महेश जंगले आणि माजी सरपंच चंद्रकांत घाडी उपस्थित होते.
यावेळी महसूल व कृषी विभागाचे अधिकारीही उपस्थित होते; ज्यामध्ये देवगड पंचायत समितीचे कृषी अधिकारी दिगंबर खराडे, सहायक कृषी अधिकारी महेश सोनार, कुणकेश्वरचे तलाठी सुजित नाईक आणि ग्रामसेवक गुणवंत पाटील यांचा समावेश होता. याशिवाय परिसरातील अनेक स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.