पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर नगरपंचायत व पशुसंवर्धन विभागाची संयुक्त कारवाई; शहरातील सर्व मोकाट गुरांना टप्प्याटप्प्याने टॅग लावणार
देवगड,दि.१६ जुलै
देवगड-जामसंडे शहरात मोकाट गुरांच्या धडकेत तरुण मिलिंद घाडी यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू लक्षात घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला तातडीने कोंडवाडा सुरू करण्यासह मोकाट गुरांचे टॅगिंग करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नगरपंचायत आणि पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने शहरात मोकाट गुरांच्या टॅगिंग मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.
मोहिमेचा शुभारंभ नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ७ मध्ये करण्यात आला. यावेळी नगरसेवक रोहन खेडेकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माधव घोगरे, सहाय्यक डॉ. संतोष पोळ तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी यांनी सांगितले की, शहरात घडलेल्या दुर्दैवी अपघातानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी या विषयाची गंभीर दखल घेत प्रशासनाला तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मोकाट गुरांच्या टॅगिंग मोहिमेला प्रारंभ करण्यात आला असून, शहरातील सर्व प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेमुळे मोकाट गुरांची ओळख निश्चित होण्यास मदत होणार असून, संबंधित मालकांवर जबाबदारी निश्चित करणे, तसेच शहरातील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.