शासनाच्या नव्या निर्देशांनुसार आरक्षण सोडत; न.मा.प्र. प्रवर्गातील एक पद कमी करून खुल्या प्रवर्गात वाढ
देवगड,दि.२४ जुलै
महाराष्ट्र शासनाने सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत केलेल्या सुधारित निर्देशांनुसार देवगड तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणात बदल करण्यात आला आहे. तालुक्यात एकूण ७२ ग्रामपंचायती असून नागरिकांचा मागास प्रवर्ग (न.मा.प्र.) मधील एक सरपंचपद कमी करून ते खुल्या प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहे.
या अनुषंगाने शुक्रवारी तहसील कार्यालयात आरक्षणाची फेरसोडत काढण्यात आली. सोडतीनंतर विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शीतल जाधव यांनी केली.
आरक्षण सोडत प्रक्रियेदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख रवींद्र जोगळ, तालुकाप्रमुख विलास साळसकर, शिरगांवचे सरपंच समीर शिरगांवकर, तोरसोळेच्या सरपंच तेजस्विनी पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच नायब तहसीलदार संतोष खरात आणि विवेक शेठ यांनीही प्रक्रियेस उपस्थिती लावली.