राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसेवा सप्ताहांतर्गत उपक्रम; जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे कार्यकर्त्यांना पक्षबांधणीचे आवाहन
देवगड,दि.२९जुलै
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसेवा सप्ताहानिमित्त तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त देवगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोंड येथे वृक्षारोपण आणि अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक प्रमुख उपस्थित होते.
यावेळी देवगड तालुका अध्यक्ष रशीद खान, प्रांतिक सदस्य बाळासाहेब कोयंडे, जिल्हा सचिव प्रसाद कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत मोंड ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर बाळासाहेब कोयंडे यांच्या सभागृहात स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे पक्षाची मोठी हानी झाल्याचे सांगितले. मात्र कार्यकर्त्यांनी खचून न जाता पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी जोमाने काम करावे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले. तसेच अजितदादा हे कार्यक्षम आणि सर्वसामान्यांसाठी झटणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास देवगड तालुका अध्यक्ष रशीद खान, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, प्रांतिक सदस्य बाळासाहेब कोयंडे, जिल्हा सचिव प्रसाद कुलकर्णी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.