विजयदुर्ग, रामेश्वर व गिर्ये गावांसाठी ऑनलाइन फोटो स्पर्धेचे आयोजन; ‘किल्ले संवर्धना’सह पाच विषयांवर आरास साकारण्याची संधी
देवगड,दि.०४ सप्टेंबर
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विजयदुर्ग ग्रामविकास मंडळातर्फे यंदाही विजयदुर्ग, रामेश्वर आणि गिर्ये या तीन गावांसाठी घरगुती उत्कृष्ट गणपती सजावट व आरास ऑनलाइन फोटो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून गणेशभक्तांच्या कलागुणांना वाव देतानाच सामाजिक आणि पर्यावरणपूरक विषयांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
स्पर्धेसाठी यंदा ‘किल्ले संवर्धन’, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समावेश झालेला किल्ले विजयदुर्ग, ‘पाणी वाचवा-पाणी बचत’, ‘ग्लोबल वॉर्निंग’ आणि ‘टाकाऊ ते टिकाऊ’ हे पाच विषय देण्यात आले आहेत.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विजयदुर्ग, रामेश्वर आणि गिर्ये येथील ग्रामस्थांनी आपल्या स्पर्धेचा विषय व नाव १० सप्टेंबर २०२६ पर्यंत शैलेश खडपे यांच्याकडे नोंदवावे. त्यानंतर सहभागी स्पर्धकांनी आपल्या गणपती सजावटीचा एकच फोटो १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाठवायचा आहे.
फोटोसोबत स्पर्धकाचे संपूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. फोटो बाळगौरव मणचेकर, शैलेश खडपे किंवा चंद्रकांत बिडये यांच्या मोबाईल क्रमांकावर पाठविता येणार आहे.
विजयदुर्ग गावातील स्पर्धा गौरी-गणपतीपर्यंत, तर रामेश्वर व गिर्ये येथील स्पर्धा अनंत चतुर्दशीपर्यंत सुरू राहणार आहे. स्पर्धकांनी आपल्या घरी गणपती बाप्पा किती दिवस विराजमान राहणार आहेत, त्याची तारीखही कळविण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
स्पर्धकांनी पाठविलेल्या सजावटीच्या छायाचित्रांचे परीक्षकांकडून परीक्षण करण्यात येणार असून, उत्कृष्ट सजावट करणाऱ्या विजेत्यांना मंडळातर्फे आकर्षक पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणाची तारीख व वेळ नंतर कळविण्यात येणार आहे.
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार असून स्पर्धेच्या नियमांबाबतचे सर्व अधिकार मंडळाकडे राहतील, असे विजयदुर्ग ग्रामविकास मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शैलेश खडपे यांच्याशी ७९७७८७४६५८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे